(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
श्रुतीने सोहा अली खानच्या पॉडकास्टमध्ये मासिक पाळी, सेटवर काम करताना येणाऱ्या अडचणी आणि ‘पीरियड हॉलिडे’बद्दल मनमोकळेपणाने चर्चा केली.
मासिक पाळीच्या त्रासाबद्दल बोलताना श्रुतीने गंमतीच्या अंदाजात म्हटलं की, पुरुषांना महिलांना होणारा हा त्रास समजत नाही. त्यामुळे पुरुषांनाही मासिक पाळी यावी, अशी आपण हजारो वेळा देवाकडे प्रार्थना केली आहे, असं तिने सांगितलं.
तिने पुढे म्हटलं की, पुरुषांनाही मासिक पाळीचा अनुभव आला तर कामाच्या ठिकाणी ‘पीरियड हॉलिडे’चं महत्त्व त्यांना समजेल. आपल्या करारांमध्येही मासिक पाळीच्या रजेची तरतूद असावी, असं तिचं मत आहे.
श्रुतीने सांगितलं की, करिअरच्या सुरुवातीच्या काळात तिला सेटवर मासिक पाळीबद्दल बोलण्याची भीती वाटायची. या विषयावर कोणालाही बोलायचं नसेल, असं तिला वाटायचं. मात्र, नंतर तिच्या लक्षात आलं की, आपल्याला होणारा त्रास टीमला आधीच सांगितला तर शूटिंगदरम्यान टीम त्यानुसार काम करू शकते.
सहकलाकाराच्या अनुभवातून मिळाला आत्मविश्वास
यासाठी तिने एका सहकलाकाराचा अनुभवही सांगितला. सहकलाकाराने गुडघ्याच्या शस्त्रक्रियेबद्दल टीमला सांगितल्यानंतर संपूर्ण टीमने त्याची परिस्थिती लक्षात घेऊन शूटिंगचं नियोजन केलं होतं.
हे पाहिल्यानंतर श्रुतीलाही आपल्या मासिक पाळीच्या त्रासाबद्दल मोकळेपणाने बोलण्याचा आत्मविश्वास मिळाला. तिने दिग्दर्शकाला याबद्दल सांगितल्यावर त्यानेही आपल्या मुलीला मासिक पाळीदरम्यान खूप वेदना होत असल्याचं सांगितलं. त्यानंतर या विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्याचं श्रुतीने सांगितलं.
‘मला पीरियड्स आले आहेत’ असं सांगायला सुरुवात केली
श्रुतीच्या म्हणण्यानुसार, आपली समस्या टीमला माहीत असेल तर ते अधिक चांगल्या पद्धतीने सहकार्य करू शकतात. त्यामुळे मासिक पाळी आली असताना ती आता ही गोष्ट लपवत नाही.
“मी काम करेन, पण मी कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे जर तुम्हाला माहीत असेल, तर तुम्ही अधिक पाठिंबा देऊ शकता,” अशा शब्दांत तिने आपला अनुभव सांगितला.
लग्नाबद्दलही व्यक्त केली होती भीती
श्रुती हासनने याआधी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही मोकळेपणाने भाष्य केलं आहे. लग्नाच्या कल्पनेने आपल्याला भीती वाटत असल्याचं तिने सांगितलं होतं. स्वतःची ओळख आणि स्वातंत्र्य निर्माण करण्यासाठी तिने खूप मेहनत घेतली असल्याने लग्नानंतर त्यावर परिणाम होईल की काय, अशी भीती असल्याचं तिने म्हटलं होतं.
मात्र, श्रुतीचा प्रेम आणि नात्यांमधील वचनबद्धतेवर विश्वास आहे. भविष्यात आई होण्याची इच्छाही तिने व्यक्त केली आहे. आता मासिक पाळी आणि ‘पीरियड हॉलिडे’बाबत केलेल्या तिच्या वक्तव्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.
Mysaa Teaser: रश्मिका मंदानाचा रफ-टफ अवतार पाहून व्हाल थक्क! वडील-मुलीच्या नात्याची अनोखी कथा






