
(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)
Shahrukh Khan King Movie: बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानचा आगामी चित्रपट ‘किंग’ सध्या चर्चेत आहे. या चित्रपटातील ‘तू मिल जाये’ हे नवीन गाणे प्रदर्शित झाल्यानंतर आता एका वेगळ्याच कारणामुळे वाद निर्माण झाला आहे. या गाण्यात अभिनेत्री दीपिका पदुकोणने परिधान केलेल्या भगव्या रंगाच्या पोशाखावरून काही नेत्यांसह अयोध्येतील महंतांनी आक्षेप घेतला आहे. काहींनी याला सनातन धर्माचा अपमान म्हटले असून चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणीही केली आहे.
शाहरुख खानच्या वाढदिवशी म्हणजेच २ नोव्हेंबर रोजी ‘तू मिल जाये’ हे गाणे प्रदर्शित झाले. अवघ्या सहा दिवसांत या गाण्याला यूट्यूबवर ६.५ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. मात्र, गाण्यातील दीपिकाच्या भगव्या पोशाखामुळे सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यावरूनही यापूर्वी असाच वाद निर्माण झाला होता.
या वादाची सुरुवात दिल्लीतील पतपडगंजचे भाजप आमदार रवींद्र सिंग नेगी यांच्या वक्तव्याने झाली. त्यांनी गाण्यातील दीपिकाच्या भगव्या पोशाखावर आक्षेप घेतला. भगवा रंग हा सनातन धर्माचे प्रतीक असल्याचे सांगत त्यांनी या चित्रपटावर देशव्यापी बहिष्कार टाकण्याची मागणी केली. तीन वर्षांपूर्वी ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्यातही दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केली होती. त्याच घटनेचा संदर्भ देत नेगी यांनी शाहरुखच्या चित्रपटातून पुन्हा सनातन धर्माची थट्टा केली जात असल्याचा आरोप केला.
जगद्गुरू परमहंस आचार्य यांचा तीव्र इशारा
एएनआयशी बोलताना अयोध्येतील तपस्वी छावणी पीठाचे प्रमुख जगद्गुरू परमहंस आचार्य यांनीही या गाण्यावर नाराजी व्यक्त केली. भगवा रंग भारतीय संस्कृतीचे प्रतीक असल्याचे सांगत त्यांनी गाण्यातील आक्षेपार्ह दृश्ये हटवण्याची मागणी केली. तसेच, पैशांसाठी भगव्या रंगाचा अपमान करणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, असे वक्तव्य त्यांनी केले. भगव्या रंगाचा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
महंत सीताराम दास महाराज काय म्हणाले?
अयोध्येतील महंत सीताराम दास महाराज यांनीही दीपिका पदुकोणच्या पोशाखावर आक्षेप घेतला. ‘किंग’ चित्रपटातील गाण्यात भगवे कपडे घालून डिस्को डान्स करणे सहन केले जाणार नाही, असे ते म्हणाले. भगवा रंग शौर्य, त्याग, समर्पण आणि भक्तीचे प्रतीक असल्याचे सांगत त्यांनी कलाकारांनी या रंगाचा वापर करताना त्याचा आदर राखावा, असे मत व्यक्त केले. तसेच भगव्या रंगाला बदनाम करण्याचा काही कट आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
या वादादरम्यान अयोध्येतील आणखी एका महंतांनी ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्याचा संदर्भ दिला. त्यांच्या मते, यापूर्वीही भगव्या कपड्यांतील दृश्यांवरून साधूंनी विरोध दर्शवला होता. आता ‘किंग’ चित्रपटातील गाण्यातही अशाच प्रकारची दृश्ये दाखवण्यात आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, ‘तू मिल जाये’ या गाण्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत असतानाच दीपिकाच्या भगव्या पोशाखावरून निर्माण झालेल्या या वादामुळे ‘किंग’ चित्रपटाची चर्चा आणखी वाढली आहे. आता या प्रकरणावर शाहरुख खान, दीपिका पदुकोण किंवा चित्रपटाच्या निर्मात्यांकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.