आमदार नरेंद्र मेहता यांच्या मागणीला यश! मिरा-भाईंदरच्या वाहतूक आयुक्तालयांतर्गत स्वतंत्र पोलीस उपायुक्त पदाला शासनाची मंजुरी
विजय काते: मिरा-भाईंदर शहरातील वाढती लोकसंख्या, वाहनांची वाढती संख्या आणि दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली वाहतूक कोंडी लक्षात घेता, वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयांतर्गत वाहतूक शाखेसाठी स्वतंत्र पोलीस उपायुक्त (डीसीपी) पद निर्माण करण्यास महाराष्ट्र शासनाने अधिकृत मान्यता दिली आहे.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)
भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी शहरातील वाहतूक समस्येची गंभीरता लक्षात घेऊन स्वतंत्र पोलीस उपायुक्त पदाची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. शहराच्या वाढत्या विस्ताराच्या तुलनेत वाहतूक व्यवस्थापनावर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी स्वतंत्र वरिष्ठ अधिकाऱ्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले होते.
आमदार नरेंद्र मेहता यांच्या या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेत पोलीस महासंचालक (डीजीपी) यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ३ नोव्हेंबर २०२६ रोजी महाराष्ट्र शासनाकडून स्वतंत्र पोलीस उपायुक्त पदाच्या निर्मितीला अधिकृत मंजुरी देण्यात आली.
या निर्णयामुळे मिरा-भाईंदर परिसरातील वाहतूक नियोजन, वाहतूक कोंडीवर नियंत्रण, वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी तसेच अपघातप्रवण ठिकाणी उपाययोजना करण्यास अधिक बळ मिळण्याची अपेक्षा आहे. वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेला स्वतंत्र नेतृत्व मिळाल्याने नागरिकांना दिलासा मिळू शकतो.
या निर्णयाबद्दल आमदार नरेंद्र मेहता यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले असून, मिरा-भाईंदरच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सुविधांसाठी शासन कटिबद्ध असल्याची भावना व्यक्त केली आहे.एकूणच, स्वतंत्र पोलीस उपायुक्त पदाच्या निर्मितीमुळे मिरा-भाईंदरच्या वाहतूक व्यवस्थापनात सुधारणा होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.






