Today's Maharashtra Breaking News Updates in marathi 07.11.2026
Maharashtra to World Breaking News :
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आंदोलनविरोधी परिपत्रकावरून विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या असून विद्यार्थ्यांनी कुलगुरूंची गाडी अडवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. हिंगोलीत शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार डॉ. संतोष टारफे यांच्यासह जिल्हाप्रमुखांचा शिंदे गटात प्रवेश केला.
केंद्र सरकारचा मोठा निर्णय घेतला आहे. ‘अग्निवीर’ योजनेअंतर्गत सैनिकांचा सेवा कालावधी दोन वर्षांनी वाढवण्यात आल्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. ६,००० कोटींच्या महादेव सट्टेबाजी अॅप प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ चंद्राकरला विशेष न्यायालयाकडून ८ दिवसांची CBI कोठडी सुनावण्यात आली आहे.
HOGM 2026 परिषदेदरम्यान भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ब्रिटनचे पंतप्रधान अँडी बर्नहॅम यांची भेट घेऊन CETA करारावर चर्चा केल्याचे सांगितले जात आहे. चिनी कम्युनिस्ट पक्षाचे माजी उच्चपदस्थ नेते मा शिंगरुई यांच्याविरोधात लाचखोरीप्रकरणी औपचारिक आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज आयसीसी (ICC) एकदिवसीय क्रमवारीच्या अव्वल स्थानी; भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराजची एका स्थानाने घसरण झाली आहे.
05 Nov 2026 05:58 PM (IST)
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी गुरुवारी हरियाणातील करनाल येथे काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. भाजपच्या ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ पदयात्रेच्या समारोपप्रसंगी त्यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना थेट आव्हान दिले. संसदेत चर्चा करण्याऐवजी गोंधळ आणि बहिष्काराचे राजकारण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, एसआयआर प्रक्रियेवर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यास भाजप तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
05 Nov 2026 05:48 PM (IST)
भारतीय शेअर बाजारात गुरुवारी, ५ नोव्हेंबर रोजी जोरदार तेजी पाहायला मिळाली. सलग सहाव्या कारोबारी सत्रात बाजारातील तेजी कायम राहिली. गुरुवारी (5 नोव्हेंबर 2026) व्यवहाराच्या अखेरीस सेन्सेक्स तब्बल २,००८.६१ अंकांनी म्हणजेच २.६० टक्क्यांनी उसळून ७९,३१०.०१ वर बंद झाला. तर निफ्टी ५७६ अंकांनी म्हणजेच २.४० टक्क्यांनी वाढून २४,५३६.६० वर पोहोचला. जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत, परदेशी गुंतवणूकदारांची जोरदार खरेदी आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण यामुळे भारतीय बाजाराला मोठा आधार मिळाला.
05 Nov 2026 05:38 PM (IST)
इंटरनॅशनल फुटबॉल जगतातून एक अत्यंत मोठी आणि भावूक करणारी बातमी समोर आली आहे. पोर्तुगालचा महान फुटबॉलपटू आणि जागतिक फुटबॉलचा महानायक क्रिस्टियानो रोनाल्डो याने इंटरनॅशनल क्रिकेटमधून संन्यास घेण्याची घोषणा केली आहे. त्याने सोशल मिडियावर एक भावूक करणारा व्हिडिओ शेयर केला आहे. या व्हिडिओमधून त्याने हा निर्णय जाहीर केला आहे. त्याच्या या घोषणेमुळे जगभरातील फुटबॉलप्रेमींना मोठा धक्का बसला आहे.
05 Nov 2026 05:25 PM (IST)
पायी जाणाऱ्या नागरिकांना लक्ष्य करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून पसार होणाऱ्या सराईत चोरट्याला चतुःशृंगी पोलिसांनी दहा दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर बेड्या ठोकल्या आहेत. शहरातील विविध भागांतील तब्बल २५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून पोलिसांनी आरोपीचा माग काढला आहे. हडपसर परिसरात पुणे-सोलापूर महामार्गावर पाठलाग करून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व चोरीचा मुद्देमाल असा एकूण ३ लाख ९३ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
05 Nov 2026 05:11 PM (IST)
कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीच्या माध्यमातून आर्थिक दिलासा मिळणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत जिल्ह्यातील १२ हजार ८८६ पात्र शेतकऱ्यांना ७८ कोटी ९४ लाख रुपयांचा लाभ मिळत आहे. राज्य शासनाकडून लाभार्थ्यांच्या खात्यात कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात येत असून, त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना थकीत पीक कर्जाच्या भारातून दिलासा मिळणार आहे.
05 Nov 2026 04:57 PM (IST)
केंद्रीय निवडणूक आयोगाने सहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनर्विलोकनासाठी (SSR)ची घोषणा केली आहे. १ जानेवारी २०२७ उर्वरित आणखी सहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनर्विलोकनाची सुरूवात होणार आहे. या भागांमध्ये ३० नोव्हेंबर रोजी मतदार याद्यांचा मसुदा प्रसिद्ध केला जाईल, तर अंतिम यादी २१ जानेवारी २०२७ रोजी प्रसिद्ध केली जाईल. या प्रक्रियेमध्ये नवीन मतदारांची नावे समाविष्ट केली जाणार आहे. यासोबतच २०२७ मध्ये १८ वर्षांचे होणाऱ्यांकडून आगाऊ अर्ज स्वीकारले जाणार आहेत. वाचा सविस्तर..
05 Nov 2026 04:47 PM (IST)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसबाबत सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. दिवाळी उत्सवानिमित्त एसटी कर्मचाऱ्यांना १० हजार रुपयांचा बोनस दिला जाणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. वाचा सविस्तर..
05 Nov 2026 04:27 PM (IST)
अमरीकेच्या राजकारणात आणि जागतिक उद्योग जगतात सध्या एका मोठ्या धक्क्याची चर्चा सुरू आहे. अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला मोठा पराभव पत्करावा लागला आहे. या राजकीय उलथापालथीचा सर्वात मोठा फटका जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि उद्योगपती इलॉन मस्क (Elon Musk) यांना बसला आहे. निवडणुकीच्या काळात मस्क यांनी रिपब्लिकन उमेदवारांच्या विजयासाठी पाण्यासारखा पैसा ओतला होता, परंतु डेमोक्रॅट्सनी संसदेच्या दोन्ही सभागृहांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केल्यामुळे आता मस्क यांच्यासमोरील अडचणी कैक पटीने वाढल्या आहेत. केवळ आर्थिक नुकसानच नव्हे, तर त्यांच्या व्यावसायिक कंपन्या, सरकारी कंत्राटे आणि प्रशासकीय भूमिकेवरून आता कडक संसदीय चौकशीचे शुक्लकाष्ट त्यांच्या मागे लागले आहे. वाचा सविस्तर..
05 Nov 2026 04:17 PM (IST)
आयसीसी (ICC) पुरुष क्रिकेट विश्वचषक लीग २ मधील अंतिम सामना ओमान आणि युएई यांच्यात खेळला गेला. ओमानने हा सामना ४२ धावांनी गमावला. तरीही, ओमानने २०२७ एकदिवसीय विश्वचषक पात्रता फेरीत आपले स्थान निश्चित केले. चांगल्या नेट रन रेटच्या आधारावर ओमानने नामिबियाला मागे टाकत १०-संघांच्या जागतिक पात्रता फेरीत थेट प्रवेश मिळवला. वाचा सविस्तर..
05 Nov 2026 04:00 PM (IST)
इस्रायलमधील (Israel Elections) सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर देशातील राजकीय घडामोडींना अभूतपूर्व वेग आला आहे. कोणत्याही एका पक्षाला किंवा आघाडीला स्पष्ट बहुमत मिळवण्यात अपयश आल्याने इस्रायलमध्ये पुन्हा एकदा त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, देशात एक स्थिर आणि सक्षम सरकार स्थापन करण्यासाठी इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झोग यांनी नवनिर्वाचित क्नेसेट (संसदेतील) सर्व लहान आणि मोठ्या पक्षांच्या प्रतिनिधींसोबत राजकीय सल्लामसलतीची प्रक्रिया सुरू केली आहे. जेरुसलेममधील राष्ट्राध्यक्ष भवनातून थेट प्रक्षेपित होत असलेल्या या बैठकांकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले असून पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू पुन्हा एकदा खुर्ची वाचवण्यात यशस्वी होतात की गडी आयझेनकोट नवीन पंतप्रधान बनतात, याविषयीची उत्सुकता ताणली गेली आहे.
05 Nov 2026 03:59 PM (IST)
Kolhapur Gokul Politics : राज्याच्या राजकारणात सध्या ‘गोकुळ‘ चा मुद्दा चांगलाच पेटला आहे. राज्य सरकारने गोकुळवर चार संचालक नेमण्याचा निर्णय घेतल्यानंतर विरोधक मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले आहेत. आधीच राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आपापसांत भिडत आहेत. अश्यातच आता गोकुळच्या मुद्द्यावरून विरोधकांनी रान पेटवलं आहे. आमदार सतेज पाटील या मुद्द्यावरून वारंवार सरकारला घेरत असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
05 Nov 2026 03:55 PM (IST)
Kolhapur Gokul Politics News: गोकुळची सत्ता मिळवायची आणि कोल्हापुरकरांनी आमच्या बाजुने दिलेला कौल नाकारायचे काम सरकारने केल आहे. याचा आम्ही निषेध करतो. पण कालच्या मंत्रिमंडळाचा निर्णयाचाही आम्ही निषेध करत आहोत. आमचं बहुमत तांत्रिक मुद्दा काढून ते बहुमत स्वत:कडे वळवायचा प्रयत्न महाराष्ट्रातील जनता पाहत आहे. याचे उत्तर सरकारला द्यावं लागणार आहे.अशा शब्दात काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे.
05 Nov 2026 03:50 PM (IST)
पुणे : पुणे जिल्ह्यात जबरी चोरी, दरोडा, घरफोडी करणाऱ्या दोन जणांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून १२ गुन्हे उघडकीस आणून, सोन्याचे दागिने, दोन दुचाकी असा मिळून १५ लाख ५० हजारांचा ऐवज जप्त केला आहे. मोबाइल उर्फ हरी पवार (वय २२ रा. सुगाव भोसे, पंढरपूर) आणि शक्तीमान हुबर्या काळे (वय २२ रा माळेगाव, बारामती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे.
05 Nov 2026 03:45 PM (IST)
Husband Decapitates Wife: पश्चिम बंगालमधून एक अत्यंत मन सुन्न करणारी आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. एका पतीने आपल्याच पत्नीचे शीर आणि धड वेगळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पत्नीची अतिशय अमानुषरीत्या हत्या केल्यानंतर नराधम पती तिचे कापलेले शीर हातात घेऊन थेट मंदिरात जाऊन बसल्याचे समोर आले आहे. या भीषण घटनेमुळे परिसरात एकच दहशत पसरली असून पोलिसांनी संशयित आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत.
05 Nov 2026 03:40 PM (IST)
मुंबई : नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. मात्र, ते खोटारडे व्यक्तिमत्त्व आहे. मोदींनी सर्वांचीच चौकशी करायला हवी; मात्र ते सोयीस्कर चौकशी करतात. सुप्रिया सुळे यांचे नाव घेऊन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पंतप्रधान मोदींनी कितीही राजकीय फासे टाकले, तरी शरद पवार त्यांच्या जाळ्यात अडकणार नाहीत, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
05 Nov 2026 03:35 PM (IST)
Raghav Juyal: रणबीर कपूरचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘रामायण’ चित्रपट आज, ५ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. ‘रामायण’च्या प्रदर्शनाने प्रेक्षकांना अनेक आश्चर्याचे धक्के दिले. ‘रामायण’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. चित्रपटातील कलाकार, त्यांचे लूक आणि कथानकाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. अशातच चित्रपटाच्या निर्मात्यांनी चाहत्यांना एक मोठं सरप्राइज दिलं आहे. रावणाचा मुलगा मेघनाद अर्थात इंद्रजितच्या भूमिकेत अभिनेता राघव जुयाल दिसणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, राघवच्या या भूमिकेबद्दल आधी कोणालाही माहिती नव्हती. चित्रपट पाहिल्यानंतरच त्याच्या भूमिकेचा उलगडा झाला.
05 Nov 2026 03:30 PM (IST)
मुंबई : सध्या दिवाळीनिमित्त शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत. बहुतांश नोकरवर्गही आपापल्या गावी जाताना दिसत आहे. त्यात नांदेड, कोल्हापूर, इंदूर यांसह अन्य शहरांकडे जाणाऱ्या बसची मागणी वाढली आहे. त्यामुळे तिकिटांचे दरही वाढले आहेत. दिवाळीनिमित्त गावी जाण्याची तयारी करणाऱ्या प्रवाशांच्या खिशावर खासगी बस ऑपरेटरांकडून डल्ला मारला जात आहे.
05 Nov 2026 03:20 PM (IST)
Factory Owner Kills Worker: बंगळुरूमधून एक अत्यंत धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. आपल्या १९ वर्षीय मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संतापातून एका फॅक्टरी मालकाने त्याच्याच २२ वर्षीय कामगाराला घरात डांबून क्रिकेट बॅटने अमानुष मारहाण केली. या भीषण मारहाणीत कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बंगळुरूच्या येलहंका परिसरात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
05 Nov 2026 03:19 PM (IST)
Virat Kohli 38th Birthday: विराट कोहली हा जगातील महान क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्याने २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि गेल्या १८ वर्षांपासून तो भारताचा सर्वात मोठा मॅच-विनिंग खेळाडू ठरला आहे. आज ‘रन मशीन’ विराट कोहलीचा वाढदिवस आहे, तो ३८ वर्षांचा झाला आहे. त्याचा जन्म ५ नोव्हेंबर २०२६ रोजी नवी दिल्लीत झाला. कोहलीने आपल्या कारकिर्दीत अनेक महत्त्वपूर्ण विक्रम प्रस्थापित केले आहेत. पण, तुम्हाला माहितीये का, विराट कोहलीच्या असे विक्रम जे मोडणे केवळ कठीणच नाही, तर अशक्य आहे. जाणून घेऊयात.
05 Nov 2026 01:55 PM (IST)
छत्रपती संभाजीनगर शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. बंद घरांची पाहणी करून हात साफ करणाऱ्या सराईत चोरट्यांनी आता तीसगाव येथील म्हाडा कॉलनी परिसरात जोरदार धुमाकूळ घातला आहे. येथील ‘राज स्वप्नपूर्ती अपार्टमेंट’मध्ये मंगळवारी मध्यरात्री एकाच रात्री तब्बल सहा बंद फ्लॅट आणि रो-हाऊसचे कडे तोडून चोरट्यांनी घरफोडी केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
05 Nov 2026 01:50 PM (IST)
दक्षिण अमेरिकेतील पॅराग्वे (Paraguay) या देशातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. देशातील आघाडीची समजली जाणारी ‘युनो बँक’ (Ueno Bank) मध्यरात्री अचानक कोसळली आहे. या एकाच घटनेमुळे देशातील जवळपास निम्मी लोकसंख्या एका फटक्यात अडचणीत सापडली असून लोकांची आयुष्याची पुंजी अडकून पडली आहे. बँक बंद पडल्याचे समजताच नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आणि पाहता पाहता लाखो संतप्त लोक रस्त्यावर उतरले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मुख्य रस्त्यांवर बॅरिकेड्स उभारण्यात आले असून, हा राजकीय व आर्थिक गोंधळ निस्तरताना सरकारची तारांबळ उडाली आहे.
05 Nov 2026 01:45 PM (IST)
आपल्यापैकी बरेच जण रेशन कार्डला हलक्यात घेतात. अरे ते फक्त धान्य आणायचं कार्ड आहे, असं आपल्याला वाटतं. पण खरं सांगायचं तर हेच एक कार्ड तुमच्या घराचं नशीब बदलू शकतं. मोफत गॅस मिळवायचा असेल किंवा 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत इलाज करायचा असेल, तर आधी रेशन कार्ड लागणारच. Ration Card Benefits:
05 Nov 2026 01:40 PM (IST)
नितेश तिवारी आणि नमित मल्होत्रा यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘रामायण’ हा चित्रपट भारतीय सिनेमाच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात महागडा आणि भव्य चित्रपट आहे. याचा एकूण अर्थसंकल्प (बजेट) सुमारे ४ हजार कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. ‘रामायण’ चित्रपट ०५ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रदर्शित झाला आहे. या मेगा-प्रोजेक्टमध्ये रणबीर कपूरपासून ते साई पल्लवी, यश, सनी देओल आणि लारा दत्ता यांसारखे नामांकित कलाकार वेगवेगळ्या पौराणिक भूमिकांमध्ये दिसून येत आहेत.
05 Nov 2026 01:35 PM (IST)
भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी अल्ट्राव्हायोलेटने (Ultraviolette) EICMA 2026 मध्ये आपली नवीन Ultraviolette Tesseract Maxi इलेक्ट्रिक मॅक्सी-स्कूटर सादर केली आहे. 6 kWh बॅटरी, 20 hp पीक पॉवर आणि Hypersense Radar टेक्नोलॉजीसह ही स्कूटर युरोपियन मार्केटसाठी तयार करण्यात आली आहे. यामध्ये 7 इंच टचस्क्रीन TFT डिस्प्ले, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन, लेन चेंज असिस्ट आणि कोलिजन अलर्ट यांसारखी आधुनिक फीचर्स मिळतात. शहरातील प्रवासासोबत लांब पल्ल्याच्या राइडिंगसाठीही या स्कूटरची रचना करण्यात आली आहे.
05 Nov 2026 01:25 PM (IST)
मोठे पद, चांगला पगार आणि मानाची नोकरी असतानाही काही लोकांची पैशांची हाव सुटत नाही. याच मोहापोटी ते असे काही करून बसतात जे त्यांना शेवटी भलतेच महागात पडते. जळगावमधून अशीच एक अत्यंत धक्कादायक आणि थक्क करणारी घटना समोर आली आहे. जळगाव जिल्हा परिषदेच्या एका अधिकाऱ्याने अवघ्या दहा हजारांच्या लाचेसाठी आपली प्रतिष्ठा आणि सर्व काही गमावले आहे. एवढेच नव्हे तर, लाच घेताना रंगेहात पकडल्यानंतर त्याच्या घर आणि बँक लॉकरची झडती घेण्यात आली, तेव्हा जे समोर आले ते पाहून अधिकाऱ्यांसह साऱ्यांच्याच डोळ्यांचे पारणे फेडणारे घबाड बाहेर आले.
05 Nov 2026 01:15 PM (IST)
शेती विक्रीचे आमिष दाखवून बनावट जमीनमालक व खोटी कागदपत्रे तयार करत एका कुटुंबाला १८ लाख ९० हजार रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणातील पसार आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावरच हल्ला करण्यात आल्याची घटना मुकुंदनगरात घडली आहे. आरोपीला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताच त्याने लोखंडी टिकाव उगारला, तर कुटुंबीयांनी दगड आणि लाकडी दांड्याने पोलिसांवर हल्ला चढविला आहे. या झटापटीत पाच पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने अतिरिक्त पोलिस कुमक मागवावी लागली. त्यानंतर सौम्य बळाचा वापर करून आरोपी अर्जुन उर्फ बंडू तांबे आणि त्याचा मुलगा सोपान यांना ताब्यात घेण्यात आले. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास रेल्वे गेट क्रमांक ५६ जवळ हा प्रकार घडला आहे.
05 Nov 2026 01:05 PM (IST)
इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षा जेईई मेन २०२७ (JEE Main 2027) च्या जानेवारी सत्रासाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. या दरम्यान, एनटीएने (NTA) परदेशात राहणारे भारतीय वंशाचे विद्यार्थी आणि इतर उमेदवारांना मोठा दिलासा दिला आहे. ज्या एनआरआई किंवा इतर उमेदवारांकडे आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स नाही, ते आता त्यांच्या पासपोर्टचा वापर ओळखीचा पुरावा म्हणून करून अर्ज पूर्ण करू शकतात. सोशल मीडियावर एका एनआरआई विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात एनटीएने स्पष्ट केले आहे की, आता अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पासपोर्टचा उपयोग करता येईल.
05 Nov 2026 01:04 PM (IST)
राजधानी दिल्लीतील चावडी बाजार परिसरात गुरुवारी (5 नोव्हेंबर 2026) सकाळी एक भीषण दुर्घटना घडली. बांधकाम सुरू असलेली तीन मजली इमारत अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी अग्निशमन दल, स्थानिक पोलीस आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) यांच्या पथकांकडून मदत व बचावकार्य सुरू आहे.
05 Nov 2026 12:58 PM (IST)
परदेशात स्थायिक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आणि विशेषतः पोर्तुगालची (Portugal Citizenship) वाट धरणाऱ्या भारतीयांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. पोर्तुगाल सरकारने आपल्या नागरिकत्वाच्या नियमांमध्ये मोठे आणि कडक बदल केले आहेत. आतापर्यंत ज्यांना ५ वर्षांच्या वास्तव्यानंतर पोर्तुगालचे नागरिकत्व सहजरित्या मिळण्याची शक्यता होती, त्यांना आता यासाठी तब्बल १० वर्षे वाट पाहावी लागणार आहे. हा नवीन नियम केवळ भारतावरच नव्हे, तर पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश आणि नायजेरियासह अनेक बिगर-युरोपीय देशांच्या नागरिकांना लागू झाला आहे.
05 Nov 2026 11:50 AM (IST)
मुंबईतील पुनर्विकासाची लाट केवळ जुन्या इमारतींच्या जागी नवे टॉवर्स उभारण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. यामुळे संपूर्ण शहरात भाड्याच्या घरांची सातत्यपूर्ण मागणी निर्माण होत आहे, तसेच घरांचे भाडे वाढण्यास आणि घरमालक तसेच गुंतवणूकदारांसाठी भाड्याचा परतावा सुधारण्यास मोठी मदत होत आहे.
05 Nov 2026 11:45 AM (IST)
सारा तेंडुलकरने वेगळं क्षेत्रं निवडलं आहे. पण तिने आपल्या आजोबांचा वारसाही जपला आहे. १२ ऑक्टोबर रोजी साराचा वाढदिवस असतो. तिचा वाढदिवस घरच्या घरी तिने कसा साजरा केला याबाबत एक व्हिडिओ पोस्ट केला आणि इंटरनेटवर मात्र या व्हिडिओनंतर फक्त आणि फक्त तिच्या लग्नाची आणि अर्जुन-सानिया आता लवकरच आई-बाबा होणार की काय याची चर्चा सुरू झाली आहे.
05 Nov 2026 11:35 AM (IST)
पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या काही वर्षांपासून प्रतिक्षेत असणारा शिवाजीनगर- हिंजवडी मेट्रोमार्ग अखेर सुरू झाला आहे. हिंजवडी आयटी पार्कला शहराशी जोडणारी बहुप्रतिक्षित पुणे मेट्रो लाईन ३, बुधवारी प्रवासी सेवेसाठी सुरू झाली.
05 Nov 2026 11:25 AM (IST)
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान त्याच्या चित्रपटांसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमी चर्चेत असतो. आमिर खानने जुलै महिन्यात गौरी स्प्रॅटसोबत तिसरा विवाह केल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर दोघांनी नव्या संसाराला सुरुवात केली. मात्र, आता लग्नाच्या अवघ्या चार महिन्यांतच आमिर आणि गौरी यांच्यावर सध्याचं घर सोडण्याची वेळ आली आहे. हे जोडपं सध्या नव्या घराच्या शोधात असल्याची माहिती समोर आली आहे.
05 Nov 2026 11:15 AM (IST)
मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या संचालक मंडळाने मंगळवारी, 03 नोव्हेंबर 2026 रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत 30 सप्टेंबर 2026 रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाहीसाठी कंपनीच्या लेखा-परिक्षणापूर्वीच्या आर्थिक निकालांना मान्यता दिली
05 Nov 2026 11:10 AM (IST)
संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या (UNGA) पहिल्या समितीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या मतदानाने जागतिक मुत्सद्देगिरीत मोठे वादळ निर्माण केले आहे. पाकिस्तान आणि बेलारूस यांनी संयुक्तपणे मांडलेल्या ‘प्रादेशिक आणि उप-प्रादेशिक स्तरावर पारंपरिक शस्त्र नियंत्रण’ या ठरावाच्या बाजूने तब्बल १८० देशांनी मतदान केले. या प्रस्तावाला भारताने आणि इस्रायलने कठोर विरोध दर्शवत विरोधात मतदान केले. मात्र, सर्वात जास्त चर्चा रंगली ती भारताचा दीर्घकालीन सामरिक भागीदार असलेल्या रशियाच्या भूमिकेची. रशियाने अमेरिका आणि चीनसोबत जात या ठरावाच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताची सुरक्षा चिंतेची भूमिका आणि रशियाचे धोरण यावरून नवीन प्रश्न उपस्थित झाले आहेत.
05 Nov 2026 11:04 AM (IST)
धनत्रयोदशीच्या अगदी आधी, बुधवारी दिल्लीच्या सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली. सणासुदीच्या काळात वाढलेली मागणी आणि जागतिक बाजारात मौल्यवान धातूंच्या दरात झालेली मोठी सुधारणा यामुळे सोन्याचा भाव ४,८०० रुपयांनी वाढून प्रति १० ग्रॅम १,४६,६०० रुपयांवर पोहोचला. ऑल इंडिया सराफा असोसिएशनच्या माहितीनुसार, बुधवारी दिल्लीच्या सराफा बाजारात ९९.९ टक्के शुद्ध सोन्याचा भाव ४,८०० रुपयांनी वाढून प्रति १० ग्रॅम १,४६,६०० रुपयांवर पोहोचला. मंगळवारी सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,४१,८०० रुपये होता.
05 Nov 2026 10:50 AM (IST)
आजच्या डिजिटल आणि हायब्रिड वर्किंग कल्चरच्या युगात दुबईने पुन्हा एकदा जगाला थक्क करणारा नवा उपक्रम राबवला आहे. चार भिंतींच्या बंदिस्त ऑफिसमध्ये किंवा कॅफेमधील गोंगाटात काम करून कंटाळलेल्या लोकांसाठी दुबई नगरपालिकेने ‘वर्क फ्रॉम पार्क’ (Work From Park) ही संकल्पना प्रत्यक्ष साकारली आहे. अल बरशा पॉन्ड पार्क (Al Barsha Pond Park) येथे दुबईच्या (Dubai) पहिल्या अधिकृत ‘वर्क फ्रॉम पार्क’ केंद्राचे भव्य उद्घाटन करण्यात आले आहे. आता नोकरदार, फ्रीलान्सर्स आणि स्टार्टअप उद्योजक थेट हिरव्यागार झाडांच्या सावलीत, तलावाच्या सुंदर पार्श्वभूमीवर बसून आपले ऑफिसचे काम करू शकणार आहेत.
05 Nov 2026 10:40 AM (IST)
नागपूर येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मौजा दाभा परिसरातील जागेवर उभारण्यात येणाऱ्या जागतिक दर्जाच्या ‘आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्रा’च्या बांधकामासाठी राज्य मंत्रिमंडळाने ८७९.६३ कोटींच्या सुधारित प्रशासकीय खर्चाला मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला.
05 Nov 2026 10:30 AM (IST)
नाशिक शहरातील सिडको परिसरातील एका वाइन शॉपमध्ये घडलेल्या अतिशय धक्कादायक आणि गंभीर घटनेने संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडवून दिली आहे. कामावर असताना प्लायवूड ठोकण्याच्या प्रेसर गनचा लोखंडी खिळा थेट छातीत शिरल्याने ३९ वर्षीय कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. सुनील अनिल तायडे (वय ३९, रा. इन्कम टॅक्स कॉलनी, अंबड लिंकरोड, नाशिक) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. सुरुवातीला हा अपघात वाटत असला तरी, आता या घटनेचे अत्यंत संशयास्पद सीसीटीव्ही (CCTV) फुटेज समोर आल्याने ही घटना केवळ अपघात नसून पूर्वनियोजित घातपात असल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे.
05 Nov 2026 10:20 AM (IST)
डोंबिवलीच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असलेल्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या पुनर्विकास प्रकल्पाला अखेर आर्थिक बळ मिळाले आहे. नाट्यगृहाच्या उर्वरित कामांसाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यापूर्वी मंजूर झालेल्या १५ कोटी रुपयांच्या निधीत आता आणखी ३० कोटींची भर पडल्याने या प्रकल्पासाठी एकूण ४५ कोटी रुपयांची तरतूद झाली आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या नाट्यगृहाच्या उर्वरित कामांना गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून, डोंबिवलीकरांना नव्या आणि आधुनिक सुविधांनी सज्ज नाट्यगृहाची भेट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
05 Nov 2026 10:10 AM (IST)
महाराष्ट्रातील एम.बी. बी. एस. अभ्यासक्रमाच्या इंटर्न डॉक्टरांच्या विद्यावेतनवाढीसह विविध प्रश्नांवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने काही महिन्यांपासून पाठपुरावा करत असून शासकीय व अनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांतील इंटर्न डॉक्टरांचे विद्यावेतन दरमहा ₹१८,००० वरून ₹३०,००० करावे, तसेच खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील विद्यावेतनाच्या अनियमिततेवर नियंत्रण आणून सर्व इंटर्न डॉक्टरांना नियमानुसार विद्यावेतन मिळावे, अशा मागण्या अभाविपने मुख्यमंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केल्या आहेत. या मागण्यांच्या अनुषंगाने पालिका सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भांदिर्गे यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मुंबईतील वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता, संबंधित महाविद्यालयांचे विद्यार्थी प्रतिनिधी तसेच अभाविपचे पदाधिकारी उपस्थित होते.
05 Nov 2026 10:00 AM (IST)
मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. ‘लक्ष्या’ या नावाने घराघरांत लोकप्रिय झालेल्या या अभिनेत्याने आपल्या अभिनयाने अनेक दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी अल्पावधीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. इतकंच नाही, तर एका वर्षात त्यांनी तब्बल ११ चित्रपट साइन केले होते. मात्र, यशाच्या शिखरावर असतानाच वयाच्या अवघ्या ५०व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण मनोरंजनविश्वाला मोठा धक्का बसला होता.
05 Nov 2026 09:50 AM (IST)
Baba is much better now, and we are now driving to Mumbai.
Thank you so, so much to the entire team at Ruby Hall for taking such good care of him. Grateful from the bottom of my heart to everyone for all your best wishes. 🙏🏽
— Supriya Sule (@supriya_sule) November 4, 2026
05 Nov 2026 09:40 AM (IST)
अमेरिकेच्या २०२६ च्या मध्यावधी निवडणुकांमध्ये (US Midterm Elections 2026) राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला मोठा पराभव पत्करावा लागला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाने काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांवर म्हणजेच प्रतिनिधीगृह (House of Representatives) आणि सिनेट (Senate) या दोन्हीवर स्पष्ट बहुमत मिळवून ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. या निकालांमुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध अमेरिकन जनतेने मोठा कौल दिल्याचं स्पष्ट होत असून, आगामी काळात ट्रम्प प्रशासनासमोर कायदेशीर आणि राजकीय आव्हाने वाढण्याची शक्यता आहे.
05 Nov 2026 09:30 AM (IST)
Jio 15 Rupee Unlimited 5G Data Pack: टेलिकॉम क्षेत्रातील दिग्गज कंपनी रिलायन्स जिओने (Reliance Jio) आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी एक अत्यंत किफायतशीर आणि धमाकेदार रिचार्ज प्लान सादर केला आहे. कंपनीने देशातील सर्वात स्वस्त इंटरनेट डेटा पॅक बाजारात आणला असून, याची किंमत केवळ १५ रुपये आहे. विशेष म्हणजे, या १५ रुपयांच्या डेटा पॅकमध्ये वापरकर्त्यांना अमर्यादित (Unlimited) ५जी इंटरनेट सुविधा मिळणार आहे. एका दिवसासाठी जास्त प्रमाणात हाय-स्पीड डेटा वापरू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी हा प्लॅन अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.
05 Nov 2026 09:20 AM (IST)
Akola Hiwarkhed Municipal Council: विधानपरिषद आणि जिल्हा बँक निवडणुकीवरून राज्यातील सत्ताधारी महायुतीत आधीच तणावाचे ढग जमा झालेले असताना, आता अकोला जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. जिल्ह्यातील हिवरखेड नगरपरिषदेत भाजपने शिवसेना शिंदे गटाला थेट दणका दिला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या ४ नगरसेवकांना अपात्र करण्याचा ठराव नगरपरिषदेच्या विशेष सभेत १५ विरुद्ध ५ अशा स्पष्ट बहुमताने संमत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, सत्ताधारी भाजपच्या सदस्यांच्या थेट पाठिंब्याने आणि संमतीने हा ठराव मंजूर करण्यात आल्यामुळे स्थानिक पातळीवर भाजप-शिवसेनेतील राजकीय संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.
05 Nov 2026 09:10 AM (IST)
Pune Water Crisis Scarcity: पुणेकरांसाठी अत्यंत चिंतेची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील (Khadakwasla Dam Chain) पाणीसाठ्यात वेगाने घट होत असल्याने आगामी काळात पुण्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या खडकवासला साखळीतील धरणांमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल ५ टीएमसी (TMC) कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या तोंडावर पुण्यावर पाण्याचे मोठे संकट ओढवण्याची चिन्हे आहेत.
05 Nov 2026 08:57 AM (IST)
Gokul Milk Supply: पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या आक्रमक ऊस दर आंदोलनाचा थेट आणि तीव्र परिणाम आता दुग्ध व्यवसायावरही जाणवू लागला आहे. कोल्हापूरचा मुख्य ब्रँड असलेल्या 'गोकुळ' (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ) दूध संघाच्या वितरणाला याचा मोठा फटका बसला आहे. आंदोलनामुळे महामार्ग रोखण्यात आल्याने मुंबई आणि पुणे यांसारख्या प्रमुख शहरांमधील गोकुळच्या दूध विक्रीवर तब्बल ५० टक्क्यांहून अधिक परिणाम झाला आहे. दूध घेऊन जाणारे गोकुळचे अनेक महत्त्वाचे टँकर महामार्गावरील प्रचंड वाहतूक कोंडीत अडकून पडल्यामुळे शहरातील वितरण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.
05 Nov 2026 08:50 AM (IST)
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल होत आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे देशातील अनेक भागांतील हवामान पुन्हा बिघडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने गुरुवारी ओडिशा, छत्तीसगड, आंध्र प्रदेशसह १५ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या काळात ताशी ६० ते ७० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, चार राज्यांत जोरदार वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे उत्तर भारतातील पाच राज्यांतही मुसळधार पावसाची शक्यता आहे. तीनपेक्षा अधिक राज्यांत बर्फवृष्टी होण्याचा अंदाज असून, डोंगराळ राज्यांतील काही भागांत दरडी कोसळण्याचा धोका व्यक्त करण्यात आला आहे.
05 Nov 2026 08:44 AM (IST)
नवी दिल्ली : महिला आणि बालकांवरील लैंगिक अत्याचारांच्या प्रकरणांमध्ये न्यायप्रक्रिया गतिमान करण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशभरातील ८५० जलदगती (फास्टट्रॅक) न्यायालयांच्या विस्ताराला आणि बळकटीकरणाला मंजुरी देण्यात आली. केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली. बलात्कार आणि बालकांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित प्रकरणांचा जलद निपटारा करणे हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे. या विशेष न्यायालयांमध्ये पॉक्सो कायद्यांतर्गत प्रकरणांचीही सुनावणी होते






