फोटो सौजन्य - Social Media
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये अनुप्रिया पहिल्यांदाच रेडिओ स्टेशनमध्ये पोहोचते आणि तिला श्रोत्यांशी संवाद साधण्याची संधी मिळते. या संवादातून ती तिचा प्रवास आणि अनुभव मांडताना दिसते. मात्र, तिने घरच्यांना न सांगता हा निर्णय घेतल्यामुळे अविनाशला याचा राग येतो. त्यामुळे पुढे अनुप्रियाला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागणार, अविनाश तिच्यावर कशी प्रतिक्रिया देणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. हा विशेष भाग १७ एप्रिल रोजी रात्री ९:३० वाजता सन मराठीवर प्रसारित होणार आहे.
मालिकेत अनुप्रियाची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीप्ती केतकर हिने या भूमिकेबद्दल बोलताना सांगितले की, प्रत्येकजण आयुष्यात काही ना काही स्वप्न पाहत असतो. मात्र, अनेक वेळा विशेषतः लग्नानंतर स्त्रियांची स्वप्नं मागे पडतात. अनुप्रियाची कथा देखील अशीच आहे. रेडिओ जॉकी होण्याचं तिचं स्वप्न संसाराच्या जबाबदाऱ्यांमुळे अपूर्ण राहिलं, पण तिच्या मुलीच्या प्रेरणेने ती पुन्हा नव्याने सुरुवात करत आहे. रेडिओ स्टेशनमधील अनुभव तिच्यासाठी खूप खास आणि अविस्मरणीय ठरल्याचंही तिने सांगितले.
दीप्ती पुढे म्हणाली की, आजही अनेक महिला अनुप्रियासारखंच आयुष्य जगत आहेत. त्यामुळे स्त्रीचं आयुष्य केवळ घरापुरतं मर्यादित नसून तिची स्वतःची स्वप्नंही असतात, हा महत्त्वाचा संदेश या भागातून दिला जाणार आहे. “दीप्ती केतकर म्हणून मला अनुप्रियाचा अभिमान वाटतो, कारण ती आता स्वतःसाठी जगायला शिकते आहे,” असेही ती म्हणाली.
तिने स्वतःच्या करिअरबाबत सांगताना नमूद केले की, तिला सुरुवातीला कोरिओग्राफीमध्ये करिअर करायचं होतं, मात्र नकळत ती अभिनय क्षेत्राकडे वळली. लहान वयातच कॅमेऱ्यासमोर उभं राहण्याचा अनुभव तिला थोडा भीतीदायक वाटला होता. मात्र, आज ती आपल्या कामात समाधान शोधते. स्वतःशीच स्पर्धा करत अधिक चांगलं काम करण्याचा तिचा प्रयत्न असतो. शेवटी, प्रत्येकाने आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत आणि नवऱ्याने पत्नीला तिच्या स्वप्नांसाठी साथ द्यावी, हा संदेश तिने प्रेक्षकांना दिला.






