Raigad News: अनेक महिन्यांची प्रतीक्षा संपणार! उरणमधील खोपटा पुलाचे काम अंतिम टप्प्यात, दिवाळीत सुरू होणार वाहतूक
माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या संकल्पनेतून सन १९९५ मध्ये बांधण्यात आलेला हा पूल उरण तालुक्याच्या पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत या मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढल्याने पुलाच्या संरचनेवर ताण निर्माण झाला होता. पुलाची दुरवस्था लक्षात घेऊन करण्यात आलेल्या संरचनात्मक तपासणीत पुलाच्या अंतर्गत भागात मोठ्या प्रमाणात तडे गेल्याचे, तसेच बेअरिंग्ज खराब झाल्याचे निदर्शनास आले.
पुलाच्या बांधकामावेळी बसविण्यात आलेल्या जुन्या पद्धतीच्या बेअरिंग्ज बाजारात उपलब्ध नसल्याने त्या नव्याने तयार करून घ्याव्या लागल्या. पुलाचे मजबुतीकरण करण्यासाठी तडे गेलेल्या भागांवर युव्ह कटिंग करून इपॉक्सी, ग्राउट इपॉक्सी, कार्बन लॅमिनेट आणि फायबर रॅपिंग यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय, पुलावरील चार सेंट्रल हिज बेअरिंग्ज आणि आत रोलर रॉकर बेअरिंग्ज बदलण्यात आल्या आहेत. सध्या पुलावर नवीन लेअरिंग तसेच यूएचपीएफआरसी तंत्रज्ञानाशी संबंधित काम सुरू आहे. पुलाच्या सुरक्षेच्या दृष्टीने नवीन रेलिंगही बसविण्यात आल्या आहेत.
या पुलावर सध्या नवीन लेअरिंग तसेच युएचपीसी-एफआरसी चे काम वेगाने पूर्ण केले जात आहे. संपूर्ण भारतात फक्त तीन ठिकाणी मुंब्रा, पुणे आणि आता खोपटा पुलासाठी हे अत्यंत मजबूत व टिकाऊ कॉक्रिट वापरण्यात आले आहे. हे मलेशियन तंत्रज्ञान अत्यंत गुंतागुंतीचे असून, त्यामध्ये फायबर आणि सिमेंटचे प्रमाण जास्त असते. काँक्रिटीकरण पक्के करताना तापमानाचे नियंत्रण राखण्यासाठी ते रात्रीच्या वेळी बर्फाच्या साहाय्याने भिजवून तयार करावे लागते. त्यामुळे हे काम रात्रीच्या वेळीच केले गेले असून, एकूण २६८ मीटर लांबीचे कॉक्रीटीकरण पूर्ण करण्यात आले आहे.
हे काम जवळपास पूर्ण झाले आहे. कॉक्रिट सुकल्यानंतर दिवाळीत हा पूल सुरू करण्यात येणार आहे. – दामोदर पाटील, उपाभियता, उरण सार्वजनिक बांधकाम






