फोटो सौजन्य: iStock
मुलींना मासिक पाळी एका विशिष्ट वयात म्हणजे 13 ते 15 वयापर्यंत येते. पण अलीकडच्या काळात बदलत्या जीवनशैलीमुळे मुलींना मासिक पाळी लवकर येत आहे. 10 वर्षाच्या आत अलीकडे मुलींना मासिक पाळी येणे सुरु झाले आहे. तसेच मुलींना लवकर मासिक पाळी येण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पाळी लवकर येण्याला अर्ली मेनार्की असे म्हणतात. वैद्यकीय भाषेत बोलायचे झाले तर प्रिकॉशस प्युबर्टी म्हणजे वेळेआधीच पाळी येणे असे म्हणले जाते. जामा नेटवर्क ओपन जर्नलकडून अमेरिकेत एक संशोधन करण्यात आले होते.
संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, 71 हजाराहून अधिक महिलांवर हे संशोधन करण्यात आले होते. महिलांनी शेअर केलेल्या माहितीवरून असे आढळून आले की 1950 ते 1969 या काळात मासिक पाळी वयाच्या 12-13 वर्षी येण्यास सुरुवात झाली होती. नंतर 2000 ते 2005 या काळात वयाच्या 11-12 व्या वर्षी मासिक पाळी सुरू झाली. मात्र अलीकडे 11 वर्षाच्या आतील मुलींना मासिक पाळी येण्यास सुरूवात झाली आहे. या मुलींची संख्या 8.6% वरून 15.5% पर्यंत वाढली आहे. 9 वर्षापूर्वी मासिक पाळी येणा-या मुलींची संख्येत दुपटीने वाढ होताना दिसून येत आहे.
त्यामुळे पीरियड्सचे बदलते स्वरूप समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे संशोधक म्हणत आहेत. संशोधनात असेही आढळून आले आहे की अनेक मुलींना नियमित मासिक पाळी न येण्याची समस्या, तसेच पाळी न येणे यांचे प्रमाण वाढले आहे. अनियमित मासिक पाळीमुळे मुलींना अनेक आजार होत आहेत. ज्यामध्ये पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम किंवा पीसीओएसचाही समावेश होतो. यामुळे मुलींमध्ये हृदयविकार, लठ्ठपणा, गर्भपात या समस्यामुळे मृत्यूचा धोका वाढण्याची शक्यता असते. यासोबतच मासिक पाळी लवकर आल्याने गर्भाशय आणि स्तनाचा कर्करोग यांसारखे विविध कर्करोग होण्याचा धोका वाढतो. मुलीला वयाच्या 8-9 वर्षीच मासिक पाळी सुरू झाली तर स्तनाच्या कर्करोगाचा धोका 20% वाढतो. वयाच्या आठव्या वर्षातच मासिक पाळी येणे अत्यंत धोकादायक असल्याचा दावाही संशोधकांनी केला आहे.
मासिक पाळी लवकर येण्या मागचे कारण आणि काय काळजी घ्यावी?
संशोधकांच्या म्हणण्यानुसार, मासिक पाळी लवकर येण्याची बरीच कारणे आहेत. यातील एक पैलू म्हणजे मुलींमधील लठ्ठपणा वाढतो आहे. अशा परिस्थितीत लहानपणापासूनच लठ्ठ असलेल्या मुलींमध्ये लवकर मासिक पाळी येण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो. याशिवाय, तणाव हे देखील यामागे एक मोठे कारण आहे. अलीकडे लहान मुलांच्या आहारात फास्ट फुडचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे देखील मासिक पाळी लवकर सुरू होते. त्यामुळे पालकांनी मुलांच्या आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच मोबाइल, गेम, कमप्युटर वापरायला देऊ नये. स्क्रिन टाइम कमी करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यामागची इतर कारणे समजून घेणे गरजेचे आहे.