
फोटो सौजन्य AI
Kidney-Liver Transplant : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्यासोबत प्रत्यारोपणाची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने नियोजन करा. यासाठी निधी उपलब्ध करून देवू, आवश्यक पायाभूत सुविधा, मनुष्यबळ आणि तज्ज्ञ वैद्यकीय सेवांचे बळकटीकरण करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये किडनी व यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधांबाबत मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत मंत्री मुश्रीफ बोलत होते. बैठकीला वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, आयुक्त अनिल भंडारी, संचालक पल्लवी सापळे, विविध रूग्णालय आणि महाविद्यालयाचे अधिष्ठाता उपस्थित होते.
किडनी प्रत्यारोपणासाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय सुविधा, ऑपरेशन थिएटर, तज्ज्ञ डॉक्टर, प्रशिक्षित मनुष्यबळ तसेच इतर आवश्यक बाबींची पूर्तता करून शासकीय रुग्णालयांमध्ये ही सेवा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात यावा. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. या कामासाठी सैफी आणि जेजे रूग्णालयातील किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. गौरांग शहा,
नानावटीमधील यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. गौरव चौबल आणि जसलोक, जेजेमधील यकृत तज्ज्ञ डॉ. प्रवीण अग्रवाल विना मोबदला सहकार्य करण्यास तयार आहेत. त्यांना मुंबईतील जेजे, पुणेमधील बी.जे. मेडिकल कॉलेज, नागपूर, छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांत सुविधा निर्माण करून द्याव्यात, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. अन्य ठिकाणीही प्रत्यारोपण सुविधांचा विस्तार करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.
यकृत प्रत्यारोपणासाठीही आवश्यक तज्ज्ञ सेवा व पायाभूत सुविधा विकसित करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. अवयवदानाबाबत जनजागृती वाढविणे, उपलब्ध अवयवांचा योग्य पद्धतीने वापर करणे आणि प्रत्यारोपण प्रक्रियेला अधिक गती देणे यावरही बैठकीत चर्चा झाली.
शासकीय रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक प्रत्यारोपण सेवा उपलब्ध झाल्यास राज्यातील गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार उपचार मिळण्यास मोठी मदत होणार आहे. त्यामुळे किडनी व यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा टप्प्याटप्प्याने सक्षम करण्याच्या दृष्टीने वैद्यकीय शिक्षण विभागाने ठोस कार्यवाही करावी, असे निर्देश मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.