रक्तचाचण्यांची गरज आणि उपयुक्तता(फोटो-सोशल मीडिया)
चंद्रकांत कांबळे/पुणे : जेव्हा आपल्याला एखादा आजार होतो आणि आपण डॉक्टरांकडे जातो, तेव्हा डॉक्टर तपासणीसोबत एक चिठ्ठी देतात. त्या चिठ्ठीवर करावयाच्या काही रक्तचाचण्यांची नावे दिलेली असतात. त्या चाचण्या करण्यासाठी ते पॅथॉलॉजिकल लॅबमध्ये जाण्यास सांगतात. डॉक्टरांच्या दृष्टीकोनातून, नेमका कोणता आजार आहे हे ओळखण्यासाठी या चाचण्या अत्यंत महत्त्वाच्या असतात.आपल्या मनातही अनेक प्रश्न असतात या चाचण्यांची नेमकी काय गरज आहे? त्यांची उपयुक्तता काय? चाचण्या कधी करायला हव्यात? चाचण्या करण्यापूर्वी कोणती तयारी आवश्यक असते? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील जीवरसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सोमनाथ सलगर यांच्याशी दै. नवराष्ट्र प्रतिनिधीनी यांनी संवाद साधला आहे.
प्रश्न : डॉक्टर लॅब टेस्टची नेमकी आवश्यकता काय असते?
उत्तर : लवकर निदान करणे आणि त्या निदानानुसार योग्य वेळी उपचार सुरू करणे यासाठी या चाचण्या अत्यंत महत्त्वाच्या असतात. पुराव्यावर आधारित उपचारासाठी रक्तचाचण्यांचे अहवाल अनिवार्य आहेत. बायोकेमिस्ट्री ही शरीराची भाषा आहे जी अहवालांच्या स्वरूपात व्यक्त होते.
प्रश्न : मधुमेह आणि रक्तदाब या सामान्य आजारांसाठी कोणत्या चाचण्या केल्या जातात?
उत्तर : मधुमेह आणि रक्तदाब हे लाइफस्टाईल डिसऑर्डर्स मानले जातात.मधुमेहासाठी रँडम ब्लड ग्लुकोज,फास्टिंग ब्लड ग्लुकोज,पोस्ट-प्रँडिअल ब्लड ग्लुकोज, या चाचण्या केल्या जातात. फास्टिंग पीपी वरून आपल्याला मधुमेहाचे निदान करता येते. तर HbA1c – ही चाचणी मागील तीन महिन्यांतील रक्तातील साखरेची सरासरी पातळी सांगते.मधुमेहामुळे किडनीवर परिणाम होत असल्यास युरिया, क्रिएटिनिन या चाचण्या आवश्यक असतात.रक्तदाबासाठी लिपिड प्रोफाइल व कोलेस्ट्रॉल याही चाचण्या आवश्यक असतात.भारताला मधुमेहाची राजधानी म्हटले जाते, त्यामुळे या चाचण्यांचे महत्त्व अधिक आहे.
प्रश्न : लॅब टेस्ट करण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी?
उत्तर : रुग्णाची तयारी अत्यंत महत्त्वाची असते.मधुमेहाच्या तपासणीसाठी १० तास उपाशी पोटी फास्टिंग आवश्यक आहे. तसेच लिपिड प्रोफाइलसाठीही साधारण १० तास उपवास आवश्यक आहे.चहा–कॉफी टाळावी.जास्त व्यायाम किंवा ताणानंतर लगेच चाचणी करू नये,ही पूर्वतयारी पाळल्यास अहवाल अधिक अचूक येतात.
प्रश्न : जागो जागी अनेक लॅब उपलब्ध आहेत. चांगली व विश्वसनीय लॅब कशी निवडावी?
उत्तर : प्रशिक्षित तंत्रज्ञ,अनुभवी डॉक्टर,लॅबमध्ये योग्य क्वालिटी कंट्रोल सिस्टम, एनएबीएल प्रमाणित लॅब,एम.डी. डॉक्टरांच्या देखरेखीखाली लॅब चालते का?हे निकष पाहून लॅब निवडावी.
प्रश्न : रुग्णाला सर्वप्रथम टेस्ट करण्यापूर्वी किती खर्च येणार हा त्यांच्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न आहे ?
उत्तर : लॅबमध्ये वापरली जाणारी अत्याधुनिक साधणे, स्वयंचलित यंत्रसामग्री, महागडे रिएजेन्ट्स, उच्च दर्जाचे किट्स आणि प्रशिक्षित मनुष्यबळ—या सर्वांमुळे तपासण्यांचा खर्च वाढतो. त्यामुळे हा प्रकार तुलनेने खर्चिक ठरतो.
हेही वाचा : AUS vs ENG : कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाने घडवला इतिहास! सर्वात कमी चेंडूत गाजवला ‘हा’ पराक्रम
प्रश्न : आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी सरकारी रुग्णालयात काही सुविधा आहेत का?
उत्तर : होय. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये, विशेषतः ससून रुग्णालयात, दारिद्र्यरेषेखालील (केशरी रेशन कार्डधारक) रुग्णांसाठी सर्व रक्तचाचण्या विनामूल्य केल्या जातात.याव्यतिरिक्त ज्येष्ठ नागरिक,राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रम,प्रसूतीपूर्व माता,यांच्या चाचण्या विनामूल्य उपलब्ध असून इतर सर्वांसाठीही अत्यल्प दरात चाचण्या केल्या जातात.






