कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाने घडवला इतिहास(फोटो-सोशल मीडिया)
Ashes series 2025 : २०२५-२६ अॅशेसच्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला ८ विकेट्सने पराभूत करून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेची दमदार सुरुवात केली. सामना फक्त दोन दिवसांतच संपला, कारण फलंदाजांना खेळपट्टीवर मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आणि गोलंदाजांनी आपला दबदबा राखला. पहिल्या दिवशी १९ विकेट्स पडल्या आणि दुसऱ्या दिवशी देखील गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले आहे. तथापि, त्यानंतर ट्रॅव्हिस हेडने एक विक्रमी शतक ठोकून ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने एक विक्रम देखील रचला आहे.
हेही वाचा : Ind vs SA Test : गौतम गंभीरच्या प्रयोगांचे भारतीय संघाला अपचन! दीड वर्षात नंबर ३ वर खेळवले गेले ‘सात’ फलंदाज
दुसऱ्या डावात, जेक वेदरल्ड आणि ट्रॅव्हिस हेडने ऑस्ट्रेलियासाठी डावाची चांगली सुरुवात केली. या दोघांनी एकत्रितपणे ७५ धावा जोडून संघासाठी एक मजबूत पाया रचून दिला. त्यानंतर हेडने मैदानावर विरोधी गोलंदाजांवर हल्लाबोल सुरू ठेवला. वेदरलेड २३ धावांवर बाद झाला. त्यानंतर मैदानात लबुशेनने आला. लबुशेन आणि हेड या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ९२ चेंडूत ११७ धावांची विक्रमी भागीदारी रचली आणि ऑस्ट्रेलियाचा विजय निश्चित केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली. या दरम्यान हेडने फक्त ८३ चेंडूत १६ चौकार आणि ४ षटकारांसह १२३ धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मार्नस लाबुशेननेही शानदार ५१ धावा केल्या. या खेळींमुळे संघाने २०५ धावांचे लक्ष्य केवळ २८.२ षटकांत गाठले.
ट्रॅव्हिस हेडच्या स्फोटक खेळीने ऑस्ट्रेलियाला केवळ सामना जिंकून दिला नाही तर कसोटी इतिहासात एक विक्रम देखील प्रस्थापित केला. ऑस्ट्रेलिया आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत २०० पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य गाठणारा संघ ठरला आहे. ऑस्ट्रेलिया संघाने २८.२ षटकांत लक्ष्य गाठून ही किमया साधली. यापूर्वी इंग्लंड संघाने १९९४ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३५.३ षटकांत २०४ धावांचे लक्ष्य गाठण्याची किमया साधली आहे. यासह, ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक धावगतीने (७.२३) २००+ धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम देखील करण्याचा कारनामा केला आहे.
पर्थ येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात, मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीची देखील हेडच्या डावाइतकीच प्रशंसा करण्यात येत आहे. मिचेल स्टार्कने इंग्लंडच्या पहिल्या डावात सात आणि दुसऱ्या डावात तीन बळी असे एकूण १० बळी घेतले आहेत. त्याच्या या प्रभावी कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले आहे.






