
अब्जावधी लोक आजही मूलभूत सुविधांपासून वंचित
सुरक्षित पिण्याच्या पाण्याच्या सेवांचा लाभ घेणाऱ्यांचे प्रमाण वाढले
लाखो कुटुंबांच्या आरोग्य संरक्षणाला मिळाले बळ
सुनयना सोनवणे / पुणे: सुरक्षित पिण्याचे पाणी, स्वच्छता सुविधा आणि स्वच्छ इंधनाच्या (Navarashtra Special) उपलब्धतेत गेल्या दशकात जगभरात लक्षणीय सुधारणा झाली असली, तरी अब्जावधी लोक आजही या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. त्यातच जगातील जवळपास संपूर्ण लोकसंख्या प्रदूषित हवेचा श्वास घेत असल्याने आरोग्यावरील धोके अधिक गडद होत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘जागतिक आरोग्य सांख्यिकी २०२६ : शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी आरोग्याचे निरीक्षण’ या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
अहवालानुसार, २०१५ ते २०२४ या कालावधीत सुरक्षित पिण्याच्या पाण्याच्या सेवांचा लाभ घेणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागातही सुधारणा झाली असली, तरी शहरांच्या तुलनेत तफावत कायम आहे. सुरक्षित स्वच्छता सुविधा आणि हात धुण्यासाठी साबण-पाण्याच्या उपलब्धतेतही वाढ झाली आहे. त्यामुळे लाखो कुटुंबांच्या आरोग्य संरक्षणाला बळ मिळाले आहे.
स्वच्छ स्वयंपाकासाठी लागणाऱ्या इंधन आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढला असला, तरी जगातील सुमारे दोन अब्ज लोक अजूनही धूर आणि प्रदूषण निर्माण करणाऱ्या इंधनांवर अवलंबून आहेत. विशेषतः आफ्रिका खंडातील ग्रामीण भागात ही समस्या गंभीर स्वरूपात कायम असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
जागतिक आरोग्याच्या शाश्वतीसाठी WHO ची झाली स्थापना; जाणून घ्या 07 एप्रिलचा इतिहास
दरम्यान, हवेच्या प्रदूषणाबाबतची परिस्थिती चिंताजनक आहे. जगातील ९९ टक्के लोकसंख्या आरोग्यासाठी धोकादायक पातळीच्या प्रदूषित हवेच्या संपर्कात आहे. सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेने सुचविलेल्या मर्यादेपेक्षा अनेकपटीने अधिक असल्याने श्वसनविकार, हृदयविकार आणि अकाली मृत्यूंचा धोका वाढत आहे.
२०३० पर्यंत शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी पाणी, स्वच्छता, स्वच्छ ऊर्जा आणि प्रदूषण नियंत्रण क्षेत्रातील प्रयत्नांचा वेग वाढविण्याची गरज असल्याचे अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे.
प्रगती आणि आव्हाने
* सुरक्षित पिण्याच्या पाण्याची उपलब्धता वाढली
* स्वच्छता सेवांचा विस्तार झाला
* हात धुण्याच्या सुविधांमध्ये लक्षणीय वाढ झाली
* स्वच्छ स्वयंपाक इंधनाचा वापर वाढला
काय चिंताजनक?
* जगातील ९९ टक्के लोकसंख्या प्रदूषित हवेच्या संपर्कात
* अब्जावधी लोक अजूनही सुरक्षित स्वच्छता सुविधांपासून वंचित
* सुमारे दोन अब्ज लोक प्रदूषणकारी इंधनावर अवलंबून
* सांडपाणी प्रक्रियेतील प्रगतीचा वेग अत्यंत मंद
२०१५ ते २०२४ : वॉश सेवांमधील प्रगती
(पाणी, स्वच्छता व स्वच्छताविषयक सवयी)
स्वच्छताविषयक सवयी (हायजीन) –
१३ टक्के गुणांची वाढ
१५६.३ कोटी लोकांना नव्याने सुविधा
स्वच्छता (सॅनिटेशन) –
१० टक्के गुणांची वाढ
११५.९ कोटी लोकांना नव्याने सुविधा
A1 And A2 Milk : तुम्ही कोणतं दुध पिता A1 की A2 ? हा प्रकार नेमका आहे तरी काय ?
पिण्याचे पाणी –
६ टक्के गुणांची वाढ
९६.१ कोटी लोकांना नव्याने सुविधा
२०१५ ते २०२४ या कालावधीत सर्वाधिक प्रगती
स्वच्छताविषयक सवयी (हायजीन) क्षेत्रात झाली.