मुंबई : कर्करोग हा जगातील अत्यंत धोकादायक रोगांपैकी एक आहे. परंतू घाबरण्यची गरज नाही वेळेवर उपचार घेतले तर यापासून सुटका मिळू शकते. कोरोना आल्यापासून मागील दोन वर्षांत आपण सर्वजण कोरोनाला टाळण्यात इतके व्यस्त झालो आहोत की बाकीचे आजार आपल्या लक्षात येत नाहीत. लॉकडाऊनमध्ये संसर्गाच्या भीतीमुळे अनेकांनी इतर गंभीर आजारांच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले आहे. याच आजारांमध्ये कर्करोगाचाही समावेश आहे. डॉ. समर गुप्ते, ऑन्कोसर्जन, पीडी हिंदुजा हॉस्पिटल, खार, मुंबई म्हणतात की, त्यांना मोठ्या संख्येने प्रकरणे दिसत आहेत ज्यात रुग्णांनी प्रथम कर्करोगाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले आणि नंतर त्यांची तब्येत बिघडल्यावर रुग्णालयात धाव घेतली. अशावेळी अनेकदा रुग्णांना हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यास उशीर होतो.
महिलांविषयी देखील डॉ गुप्तेंनी काही मतं व्यक्त केली आहेत. डॉ. गुप्ते सांगतात की, कोरोना होईल या विचाराने अनेक लोक हॉस्पिटलमध्ये जायला घाबरतात. तथापि, लोकांना हे समजून घेणे आवश्यक आहे की सर्व रुग्णालयांमध्ये कोरोना प्रोटोकॉलचे पालन केले जात आहे. डॉ.गुप्ते यांच्या मते, योनिमार्गातून अनियमित रक्तस्राव, लघवी आणि मलमध्ये रक्त येणे, पोटाच्या खालच्या भागात सतत दुखणे आणि वारंवार उलट्या होणे ही कर्करोगाची लक्षणे असू शकतात. असे झाल्यास, कोरोना संपण्याची वाट पाहू नका आणि ताबडतोब डॉक्टरकडे जा आणि उपचार घ्या. उपचाराला उशीर झाल्यास कर्करोगही तुमच्यासाठी घातक ठरू शकतो. असंही मत डॉक्टरांनी व्यक्त केलं आहे.
याचप्रमाणे कॅन्सरचे अनेक प्रकार आहेत. त्यामुळे वेगवेगळी लक्षणं आढळू शकतात. पण कोरोनामुळे रुग्णालयात जाण्याची टाळाटाळ करणं धोकादायकही ठरू शकतं. डॉ. गुप्ते यांच्या मते, कोरोना विषाणू कर्करोगाच्या रुग्णांसाठी दोन प्रकारे धोकादायक ठरू शकतो. प्रथम, ते कर्करोगाच्या प्रकारावर अवलंबून असते. ब्लड कॅन्सर, ल्युकेमिया, लिम्फोमा या रूग्णांची प्रतिकारशक्ती खूपच कमी असते आणि त्यांना गंभीर कोरोना संसर्ग होण्याची शक्यता असते.
कोरोनाप्रमाणेच रुग्णांनी कर्करोगापासूनही वाचण्यासाठी काळजी घेतली पाहीजे. डॉ. गुप्ते सांगतात की, कॅन्सरच्या रुग्णांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी इतरांप्रमाणे मास्क घालणे, गर्दी टाळणे आणि सामाजिक अंतर पाळणे अत्यंत आवश्यक आहे. ते म्हणतात, “आम्ही कर्करोगाच्या रुग्णांना निरोगी, उच्च-प्रथिनेयुक्त आहार आणि व्हिटॅमिन सी समृध्द अन्न जसे की संत्री, लिंबू आणि इतर लिंबूवर्गीय फळे खाण्याचा सल्ला देतो.”