प्रवाशांनी भरलेली बस अनियंत्रित होऊन पडली खड्ड्यात; 4 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी

तामिळनाडूमध्ये मंगळवारी रात्री प्रवाशांनी भरलेल्या बसचे नियंत्रण सुटले आणि ती खोल दरीत कोसळली. या अपघातात चार जणांना आपला जीव गमवावा लागला तर २० हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे.

  तामिळनाडूमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. तामिळनाडूतील सेलम जिल्ह्यात मंगळवारी रात्री मोठी दुर्घटना (Tamilnadu Accident News) घडली. प्रवशांनानी भरलेली बस अनियंत्रित होऊन थेट दरीत कोसळली. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 20 हून अधिक जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात केले.

   सालेमला जात होती बस

  मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशांनी भरलेली ही बस येरकौडहून तामिळनाडूतील सेलमला जात होती. मंगळवारी रात्री एक खासगी बस खड्ड्यात पडली. बसमध्ये एकूण 56 प्रवासी होते. एका वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि वाहन बाजूच्या भिंतीला धडकली. पण वाहनाचा वेग थोडा जास्त असल्याने बस भिंतीला धडकून खाली खड्ड्यात पडली.

  बसचं अचानक नियंत्रण सुटलं

  येरकौडहून सालेमकडे जाणाऱ्या बसचे अचानक नियंत्रण सुटल्याने ती प्रथम बाजूच्या भिंतीला धडकली आणि नंतर ती तोडून खोल दरीत कोसळली. बस खड्ड्यात पडून पलटी झाली तर आत अडकलेल्या प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. बस अपघातानंतर रस्त्यावर बघ्यांची गर्दी झाली. स्थानिक लोकांनी तत्काळ पोलिसांना पाचारण केले. पोलीसही घटनास्थळी पोहोचले आणि रुग्णवाहिका बोलवण्यासोबतच मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. अपघातात ठार झालेल्या चौघांची ओळख पटवली जात आहे. यासोबतच इतर जखमींचीही ओळख पटवली जात असून त्यांच्या कुटुंबीयांना माहिती दिली जात आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घटनेचा तपास सुरू केला आहे.