मुंबई : स्पाईसजेट एअरलाईन्सच्या विमानात नुकताच एक विचित्र प्रकार घडला. स्पाईसजेटच्या फ्लाईटचे तिकीट असलेल्या एका प्रवाशाला चक्क विमानाच्या टॉयलेटमध्ये बसून संपूर्ण प्रवास करावा लागला. कमाल म्हणजे, या प्रवाशाला विमान उतरल्यानंतरच बाहेर काढता आले. या घटनेनंतर आता स्पायजेटकडून त्याला पूर्ण परतावा दिला जाणार आहे.
स्पाईसजेटच्या मुंबई-बंगळुरू फ्लाइटमध्ये ही घटना मंगळवारी घडली. हा प्रवासी विमानाच्या टॉयलेटमध्ये गेला आणि तासाभराहून अधिक वेळ झाला तरी बाहेरच आला नाही. वॉशरूमचा दरवाजा अडकला होता की जो त्याला उघडता आला नाही. दरवाजाच्या लॉकमध्ये दोष होता आणि संपूर्ण फ्लाइटदरम्यान सर्व प्रयत्न करूनही त्याला उघडता आला नाही. विमान बंगळुरूमध्ये उतरल्यानंतर इंजिनिअरच्या मदतीने हा दरवाजा उघडण्यात आला.
स्पाइसजेटने माफी मागितली
या प्रकाराबद्दल स्पाईसजेटने प्रवाशाची माफी मागितली आहे. या घटनेनंतर विमान कंपनीने सांगितले की, संपूर्ण प्रवासादरम्यान प्रवाशाला मदत आणि मार्गदर्शन करण्यात आले. जेव्हा क्रू मेंबर्सना प्रवासी अडकल्याचे समजले तेव्हा त्यांनी दरवाज्याखाली एक चिठ्ठी सरकवली आणि प्रवाशाला धीर दिला. आम्ही दरवाजा उघडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. मात्र, आम्हाला दरवाजा उघडता येत नाही. काळजी करू नका, काही मिनिटांत विमान उतरेल, असे या चिठ्ठीत लिहिले होते. या गैरसोयीबद्दल माफी मागितल्यानंतर विमान कंपनीने आता प्रवाशाला परतावा दिला आहे.






