
Abhijeet Dipke
नवी दिल्ली : ‘लहरा दो तिरंगा’ मोर्चापूर्वी दिल्लीतील कॅनॉट प्लेस परिसरातून ताब्यात घेण्यात आलेल्या कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके (Abhijeet Dipke) यांची जामिनावर सुटका झाली आहे. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. जामीन देताना विशेष दंडाधिकारी न्यायालयाने काही अटी दिपकेंसमोर ठेवल्या. त्यानंतर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर दिपके यांनी सोशल मीडियावर दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. या पोस्टची सध्या चर्चा होत आहे.
शुक्रवारी कॅनॉट प्लेस परिसरात ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलन आयोजित करण्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपके यांना आंदोलन न करण्याबाबत नोटीस बजावली होती. मात्र, आंदोलन करण्याच्या भूमिकेवर ते ठाम राहिल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या कलम 126 आणि 170 अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. त्यानंतर दिपके यांना मंदिर मार्ग पोलीस ठाण्याशी संबंधित विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. न्यायालयाच्या सुनावणीनंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.
Ambadas Danve : ‘भाजपने दिलं तेच घ्यावं लागतं’; अंबादास दानवेंचा शिंदेसेना-राष्ट्रवादीला जोरदार टोला
मिळालेल्या माहितीनुसार, जामिनासाठी त्यांना शांतता राखण्यासंदर्भातील बाँडवर स्वाक्षरी करावी लागली. यामध्ये सुमारे वर्षभर शांतता राखण्याच्या अटीचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
जामिनावर सुटका झाल्यानंतर अभिजीत दिपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पहिली पोस्ट केली. “२४ तास वायफाय आणि फोनशिवाय तुरुंगातून बाहेर पडताना कसे वाटते,” अशा आशयाचा मजकूर लिहून त्यांनी अभिनेता शाहरुख खान यांचा फोटो शेअर केला.
दिपके यांच्या या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी केलेली ही पोस्ट त्यांच्या समर्थकांसह सोशल मीडिया वापरकर्त्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
अभिजीत दिपके यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये सौरभ दास आणि आशुतोष रांका यांचा फोटो शेअर केला. या दोघांचा उल्लेख ‘माझे दोन भाऊ’ असा करत त्यांच्या सुटकेची प्रतीक्षा करत असल्याचे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
दिपके यांना जामीन मिळाला असला, तरी सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्या सुटकेबाबत पुढे काय घडते, याकडे लक्ष लागले आहे.
‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनापूर्वी झालेली कारवाई आणि त्यानंतर दिपके यांनी केलेल्या पोस्टमुळे कॉक्रोच जनता पार्टीच्या पुढील भूमिकेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. अभिजीत दिपके यांच्या जामिनाच्या अटी, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्या सुटकेची स्थिती आणि पक्षाकडून पुढील आंदोलनाची घोषणा होते का, याकडे लक्ष राहणार आहे.