वाराणसी : देशात द्वेषाचे वातावरण आहे. हा देश द्वेषाचा देश नाही. ‘भारत जोडो’ यात्रेत मी कन्याकुमारी ते काश्मीर चाललो होतो. माझ्या प्रवासात मला हजारो लोक भेटले. देशात भीतीचे वातावरण आहे, असाच अनुभव आल्याचे सांगत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतून केंद्र सरकारवर कडाडून हल्लाबोल केला.
उत्तर प्रदेश दौऱ्यावर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी चौथ्यांदा बाबा विश्वनाथ यांच्या दरबारात हजेरी लावली आणि नतमस्तक झाले. भारत जोडो न्याय यात्रेचा प्रवास सुरू होऊन 35 दिवस झाले आहेत. राहुल यांचा ताफा चर्चमार्गे मांडूवाडीहच्या दिशेने रवाना झाला.
मजुरांची घेतली भेट
भारत जोडो यात्रेदरम्यान त्यांनी शेतकरी आणि मजुरांची भेट घेतली असता त्या शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यथा मांडल्या. देशात अब्जाधीश आणि गरीब समान कर भरतात. त्यामुळे भारत जोडो यात्रेत न्याय हा शब्द जोडण्यात आला.
देशाला एकत्र आणणे हीच खरी देशभक्ती
जेव्हा आपण एकत्र काम करतो तेव्हाच हा देश मजबूत होतो. देशाला एकत्र आणणे हीच खरी देशभक्ती आहे. मीडियाला अदानी, अंबानी आणि मोदींचा माणूस म्हटले जाते. नोटाबंदी आणि जीएसटीच्या उणिवा कोणीही दाखवत नाही.
– राहुल गांधी, नेते, काँग्रेस






