हिंदूंविरोधात केलेले ‘ते’ वक्तव्य कॉंग्रेस आमदाराला भोवलं; पोलिसांनी घेतलं ताब्यात

हिंदू धर्माविरोधात दोन दिवसांपूर्वी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी जलेश्वर येथील काँग्रेसचे आमदार आफताब उद्दीन मोल्ला (Aftabuddin Mollah) यांना अटक करण्यात आली.

    गुवाहाटी : हिंदू धर्माविरोधात दोन दिवसांपूर्वी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी जलेश्वर येथील काँग्रेसचे आमदार आफताब उद्दीन मोल्ला (Aftabuddin Mollah) यांना अटक करण्यात आली. आफताब उद्दीन मोल्लांना पोलिसांनी दिसपूर येथील आमदार निवासातील काँग्रेसचे सहकारी आमदार वाजेद 4 अली चौधरी यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आले.

    काँग्रेस आमदाराच्या विरोधात दिसपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर शहर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी मंगळवारी रात्री गुवाहाटीच्या पूर्व पोलीस जिल्ह्यातील डीसीपी कार्यालयात आमदाराची चौकशी केल्यानंतर त्यांना विशेष शाखेच्या कक्षात ठेवण्यात आले. गोलपारा जिल्ह्यातील जलेश्वर इथे आमदारांच्या भाषणानंतर वाद सुरू होताच आफताबुद्दीन मोल्ला यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या शब्दाबद्दल माफी मागितली. मात्र, माफी मागून मोल्ला सुटू शकले नाहीत. त्यांच्याविरोधात अनेक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले.

    भेटापारा येथील दीपककुमार दास नावाच्या व्यक्तीने मंगळवारी शहर पूर्व पोलिसांत तक्रार दाखल केली. यानंतर दिसपूर पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, हिंदू धर्माविरोधात अशी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल आसाम प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भूपेन बोराह यांनी आमदाराला कारणे दाखवा नोटीस बजावली असून, त्याबाबत स्पष्टीकरण मागितले.