राजस्थान – आज देशभरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त उत्साहपूर्ण वातावरण आहे. राजस्थानमध्ये देखील महाशिवरात्रीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. मात्र यावेळी मोठा अपघात झाला आहे. राजस्थानमधील कोटा येथील एका मिरवणुकीदरम्यान अनेक मुलांना विजेचा धक्का बसला. यानंतर मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील एका मुलाची प्रकृती चिंताजनक आहे.
राजस्थानमधील कोटा येथे शुक्रवारी हा प्रकार घडला आहे. कुन्हाडी थर्मल चौकाजवळून जाणाऱ्या महाशिवरात्रीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत करंट पसरून 12 पेक्षा अधिक मुलांना विजेचा शॉक बसला. विजेचा धक्का लागल्यामुळे १४ मुलांना एमबीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल झालेल्या अनेक मुलांच्या हात-पायाला इजा झाली असून सर्वांवर तात्काळ उपचार करण्यात आले.
या घटनेनंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिरला देखील रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. त्यांनी जखमी मुलांची प्रकृती जाणून घेतल्यानंतर सर्व मुलांचे आरोग्य व्यवस्थीत राहावे यासाठी डॉक्टरांची टीम कार्यरत असल्याचे सांगितले. तर एका मुलाची प्रकृती गंभीर असून खूप लहान मुले आहेत. बालकांच्या उपचारात कोणतीही कमतरता पडू नये, अशा सूचना रुग्णालयाला देण्यात आल्या आहेत. गरज पडल्यास मुलांनाही रेफर करून उत्तम उपचार दिले जातील. असे आश्वासन ओम बिरला यांनी दिले.