Photo Credit- X
Ravichandran Ashwin: वर्षाच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर, भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) आता आयपीएलमधूनही निवृत्तीची घोषणा केली आहे. आयपीएल २०२५ मध्ये त्याच्या खराब कामगिरीनंतर त्याने हा निर्णय घेतला. अश्विनच्या या निर्णयामुळे आता आणखी काही दिग्गज खेळाडू देखील आयपीएलला निरोप देण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. या खेळाडूंनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक सामने स्वतःच्या बळावर जिंकून दिले आहेत.
भारतीय वेगवान गोलंदाज, उमेश यादव देखील निवृत्ती घेऊ शकतो. गेल्या हंगामात त्याला कोणत्याही संघाने खरेदी केले नव्हते. त्याने आतापर्यंत १४८ आयपीएल सामने खेळले असून १४४ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट ८.४९ आहे. टीम इंडियामध्ये पुनरागमन करणे त्याच्यासाठी आता कठीण दिसत आहे. त्यामुळे उमेश लवकरच क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
भारतीय वेगवान गोलंदाज इशांत शर्मा लवकरच निवृत्तीचा निर्णय घेऊ शकतो. ३६ वर्षीय इशांत सध्या भारतीय संघातून बाहेर आहे. त्याने आयपीएलमध्ये ११७ सामने खेळले असून ९६ बळी घेतले आहेत, परंतु त्याचा इकॉनॉमी रेट ८.३८ आहे. आयपीएल २०२५ मध्ये गुजरात टायटन्सचा भाग असताना तो अपेक्षित कामगिरी करू शकला नाही, ज्यामुळे त्याच्या आयपीएलमधील भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आरसीबीचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस देखील निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे. आयपीएलमध्ये त्याने १५४ सामन्यांमध्ये ४७७३ धावा केल्या आहेत, ज्यात ३९ अर्धशतकांचा समावेश आहे. मात्र, आयपीएल २०२५ मध्ये त्याची कामगिरी निराशाजनक होती. ४१ वर्षीय फाफची कारकीर्द आता धोक्यात आल्याने, तो लवकरच निवृत्त होण्याची शक्यता आहे.
आर. अश्विनने अलीकडेच चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध अनेक वेळा वादग्रस्त विधाने करून वादात सापडला होता. त्यानंतर बोलेल जाऊ लागले की, त्याची आयपीएल कारकीर्द जास्त काळ असणार नाही. आता हा अंदाज खरा ठरला आहे. आश्विनने आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली आणि त्याने लिहिले की, “आज माझ्यासाठी एक खास दिवस असून एक खास सुरुवात देखील आहे. असे म्हटले जाते की प्रत्येक सामन्याची एक नवीन सुरुवात असते, आयपीएल क्रिकेटर म्हणून माझा कार्यकाळ आज संपत आहे, परंतु विविध लीगमध्ये खेळाचा शोध म्हणून माझा वेळ आजपासून सुरू होत आहे.”