(फोटो- ट्विटर)
झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे नेते आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आणखी एक मुख्यमंत्री भाजपच्या गटात सामील झाले आहेत. झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते चंपाई सोरेन यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गेले अनेक दिवस त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू होत्या. लवकरच झारखंडमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्याआधी झामुमो मोठा धक्का समजला जात आहे. सोरेन यांच्या भाजपप्रवेशावर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी भाष्य केले आहे.
झारखंडचे तेव्हाचे आणि आताचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे मनी लॉन्डरिंग प्रकरणात तुरुंगात होते. त्यावेळेस चंपाई सोरेन हे झारखंडचे मुख्यमंत्री बनले होते. मात्र हेमंत सोरेन तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागल्याने चंपाई सोरेन नाराज झाले होते. त्यामुळेच त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे.
दरम्यान माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांच्या भाजपप्रवेशावर बोलताना केंद्रीय मंत्री शिवराजसिंग चौहान म्हणाले, ”चंपाई सोरेन हे खरोखरच झारखंडचे वाघ आहेत. आंदोलनाच्या चळवळीतून तयार झालेले असे नेते की ज्यांनी झारखंड मुक्ती मोर्चा पक्ष उभा केला. झारखंड राज्यासाठी त्यांचे कार्य मोठे आहे. जनतेमध्ये ते लोकप्रिय आहेत. झारखंडला वाचवण्यासाठी ते भाजपमध्ये आले आहेत. झारखंड मुक्ती मोर्चा केवळ पती -पत्नीचा पक्ष राहिला आहे. राज्यातील गठबंधन सरकार पायउतार होणार आहे. भारतीय जनता पक्ष झारखंडमध्ये सरकार स्थापन करेल.”
श्री @ChampaiSoren जी झारखंड के टाइगर हैं। वे आंदोलन की भट्टी में तप के निकले ऐसे नेता हैं, जिन्होंने JMM को खड़ा किया और अलग झारखंड बनने में भी उल्लेखनीय भूमिका निभाई। जनता में उनका आदर है, वो झारखंड को बचाने के लिए भारतीय जनता पार्टी में आए हैं। pic.twitter.com/0kArwltD44
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) September 1, 2024
दरम्यान २५ ऑगस्ट रोजी सोरेन यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर सोरेन यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. झारखांमध्ये पोहोचताच त्यांना झेड प्लस सुरक्षा मिळणार आहे. चंपाई सोरेन हे झारखंड मुक्ती मोर्चाचे ज्येष्ठ नेते आहेत. झारखंडच्या कोल्हान भागात त्यांचे वर्चस्व आहे. कोल्हानच्या १४ विधानसभा जागांवर चंपाई सोरेन यांची चांगली पकड आहे. सोरेन भाजपमध्ये आल्याने भाजप या १४ जागांवर आपली पकड मजबूत करू शकणार आहे. येत्या काळात झारखंडमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे चंपाई सोरेन यांचा भाजपमध्ये प्रवेश हा पक्षाला फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.