फोटो सौजन्य - सोशल मीडिया
अयोध्या : अयोध्येमध्ये मागील काही महिन्यांपूर्वी राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा दिमाखात पार पडला. यानंतर अयोध्येमध्ये रामलल्लाच्या भक्तांची गर्दी देखील वाढली. रामाचे लोभसवाणे रुपडे पाहण्यासाठी भक्त गर्दी करत आहेत. मात्र राम मंदिरामध्ये रामाची प्राण प्रतिष्ठा करणारे प्रमुख पुजारी पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनामुळे अयोध्यावासीयांवर शोककळा पसरली आहे.
पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांनी वयाच्या 86 वर्षी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांची प्रकृती खालावत चालली होती. आज त्यांचे वाराणसीमध्ये वैकुंठ गमन झाले. पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. जानेवारी महिन्यात झालेल्या अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा पूजेत पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. यावेळी त्यांनी 121 वैदिक ब्राह्मणांचं नेतृत्व करत सर्व पूजा पूर्ण केल्या. या पूजेत त्यांचा मुलगा आणि कुटुंबातील इतर सदस्यही सहभागी झाले होते. तसेच डिसेंबर 2021 मध्ये काशी विश्वनाथ धामच्या उद्घाटनाच्या पूजेतही ते सहभागी झाले होते.
महाराष्ट्राशी जिव्हाळ्याचा संबंध
पंडित लक्ष्मीकांत दीक्षित हे सर्व विद्या आणि पुजांमध्ये पारांगत होते. त्यांनी वेद आणि अनुष्ठानांची दीक्षा आपले चुलते गणेश दीक्षित भट्ट यांच्याकडून घेतली होती. लक्ष्मीकांत दीक्षित यांचे महाराष्ट्राशी जिव्हाळ्याचं नातं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकामध्ये दीक्षित यांच्या पूर्वजांचाही सहभाग होता असे म्हटले जाते. त्यांच्या निधनानंतर सर्वांनी श्रध्दांजली वाहिली आहे.