गगनयान मिशनच्या पहिल्या चाचणीसाठी काउंटडाऊन सुरू, शनिवारी सकाळी ८ वाजता अवकाशात झेपावणार!

इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रॉकेटचे उड्डाण केले जाईल आणि त्यातील सर्व यंत्रणा योग्य प्रकारे काम करत असल्याची तपासणी केली जाईल.

    2025 मध्ये आपल्या रॉकेटच्या सहाय्याने मानवाला अवकाशात पाठवण्याची भारताची योजना आहे.  ISRO या अंतराळयानाच्या क्रू एस्केप सिस्टीमची ( Vehicle Abort Mission ) शनिवारी सकाळी आठ वाजता चाचणी घेण्यात येणार आहे. त्यासाठी शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासून काऊनडाऊन सुरू झालं आहे. इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथने सांगितले की, चार चाचण्या केल्या जातील. पहिली चाचणी शनिवारी होणार आहे.

    भारतीय अंतराळ संस्था इस्रो (ISRO) आपल्या गगनयान मोहिमेवर वेगाने काम करत आहे. इस्रोकडून मानवाला अंतराळात पाठवण्याची ही पहिलीच मोहीम आहे.

    चाचणी दरम्यान मानवरहित क्रू मॉड्युल

    इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रॉकेटचे उड्डाण केले जाईल आणि त्यातील सर्व यंत्रणा योग्य प्रकारे काम करत असल्याची तपासणी केली जाईल. क्रू मॉड्यूल रॉकेटपासून वेगळे कसे होते आणि ते कसे खाली येते हे पाहिले जाईल. चाचणी दरम्यान क्रू मॉड्युलमध्ये कोणतेही मानव नसतील. गगनयान लाँच झाल्यावर या क्रू मेंबरमध्ये अंतराळवीरांचा समावेश असेल.

    चाचणी रॉकेटचे वजन 44 टन

    चाचणी रॉकेटचे वजन 44 टन आहे. त्यात सुधारित विकास इंजिन बसवण्यात आले आहे. यामध्ये द्रव इंधनाचा वापर केला जातो. क्रू मॉड्यूल रॉकेटच्या पुढील भागात स्थापित केले आहे. संपूर्ण चाचणी 531 सेकंद किंवा सुमारे 9 मिनिटांत पूर्ण होईल. क्रू मॉड्यूलचे वजन 4520 किलो आहे. चाचणीसाठी सिंगल लेयर वॉल अ‍ॅल्युमिनियम स्ट्रक्चरचे क्रू मॉड्यूल तयार केले आहे. त्यात हवेचा दाब असणार नाही. ज्या क्रू मॉड्युलमध्ये मानवांना पाठवले जाईल त्याला विमानाप्रमाणे हवेचा दाब निर्माण करावा लागेल.

    क्रू एस्केप सिस्टम समुद्रात उतरेल

    चाचणी दरम्यान, रॉकेट पहिल्या 60 सेकंदात 17 किलोमीटरची उंची गाठेल. यानंतर क्रू मॉड्यूल रॉकेटपासून वेगळे होईल. क्रू एस्केप सिस्टम 91 सेकंदात क्रू मॉड्यूलपासून वेगळे होईल. यानंतर, क्रू एस्केप सिस्टमचे पॅराशूट उघडतील आणि ते समुद्रात उतरेल. येथून बोटीच्या सहाय्याने जमिनीवर आणले जाईल. जर सर्व काही ठीक झाले, तर क्रू एस्केप सिस्टम श्रीहरिकोटा समुद्रकिनाऱ्यापासून 10 किलोमीटर अंतरावर समुद्रात उतरेल.