Top Marathi News Today Live : नेपाळमध्ये जलप्रलय; हजारो लोक गेले वाहून
Shivsena Politics : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी
मुंबई : शिवसेनेचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटांमध्ये सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढाई सुरू आहे. या प्रकरणाची न्यायालयात सतत सुनावणी सुरू आहे. सर्वोच्च न्यायालय आज या प्रकरणाची पुन्हा सुनावणी घेणार आहे. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे ठाकरे गटाचे प्रतिनिधित्व करत आहेत. वाचा सविस्तर-
18 Aug 2026 06:38 PM (IST)
रांची : झारखंडमधील कथित भरती परीक्षा गैरप्रकारांविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले आहे. राज्य सरकारने JSSC-CGL आणि TDPLमार्फत घेण्यात आलेल्या संबंधित भरती परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आंदोलनातील प्रमुख आंदोलकांनी उपोषण मागे घेण्यास सुरुवात केली आहे. JLKM नेते आणि विद्यार्थी आंदोलनाचे प्रमुख चेहरे देवेंद्र नाथ महतो यांनी तब्बल १६ दिवसांनंतर आपले उपोषण सोडले.
18 Aug 2026 06:31 PM (IST)
नवी मुंबई : नवी मुंबईतील ऐरोली-पटणी रोडवरील माईंडस्पेस परिसरात गुरुवारी एका बांधकाम साईटवर क्रेनचा अतिशय वजनदार हुक कोसळून घडलेल्या अपघातात दोन्ही कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. क्रेनचा अतिशय अवजड हुक थेट अंगावर पडल्याने एका कामगाराचा घटनास्थळीच तडफडून मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेले भोबि सुरेंद्र राय (वय ४५) यांचा कळवा येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या भीषण घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून बांधकाम क्षेत्रातील सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे.
18 Aug 2026 06:25 PM (IST)
सिंधुदुर्गनगरी: देशात आणि लंडनसारख्या परदेशात काम करूनही सुरेश प्रभू यांचे लक्ष सातत्याने कोकणच्या मातीवर आहे. कोकणाने अनेक रत्न दिल्ली, त्यात सुरेश प्रभू हे कोकणचे बावनकशी सोनं आहेत. त्यांचे महत्त्व कोणीही कमी करू शकत नाही. गेली ३० वर्षे लोकाप्रतिनिधी म्हणून आणि स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून ते सिंधुदुर्गच्या ग्रामीण जनतेची सेवा करत आहेत. देशात अनेक भारतरत्न होऊन गेले, पण सुरेश प्रभूनी कोकणचे नाव दिल्लीच्या राजकारणात उंचावले आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी केंद्रातून नवनवीन उपक्रम आणावेत, त्यासाठी आमचे सदैव सहकार्य राहील, असा मनोदय आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केला. मानव संसाधन विकास संस्थेच्या वतीने ग्रामीण जनतेच्या आरोग्यासाठी सुरू करण्यात आलेल्या 'प्रोजेक्ट संजीवनी अॅम्ब्युलन्स' चा शुभारंभ कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व श्रीफळ वाढवून उत्साहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
18 Aug 2026 06:11 PM (IST)
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी गोंदियाहून देवरीकडे सकाळी ५.३० वाजता सुरू करण्यात आलेली एसटी बस सध्या वारंवार उशिराने धावत असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. बसच्या विलंबामुळे महाविद्यालयातील एक-दोन तासिका चुकत असून, त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर होत आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
18 Aug 2026 06:06 PM (IST)
Kalyan Dombivli Politics: कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणात भाजप आणि मनसेमधील संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. हिंदी भाषिक समाजाच्या कार्यक्रमात भाजपचे कल्याण-डोंबिवली जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी केलेल्या वक्तव्यावरून मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. या वादामुळे स्थानिक राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
18 Aug 2026 05:58 PM (IST)
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील दहा स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीवरून सत्ताधारी भाजपमध्ये अद्याप एकमत न झाल्याने गेल्या सहा महिन्यांपासून रखडलेला नियुक्तीचा निर्णय अखेर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जून महिन्यात दफ्तरी दाखल करण्यात आलेला हा प्रस्ताव महापौर रवी लांडगे यांच्या पत्रानुसार येत्या गुरुवारी (ता. १८) होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवर मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. मात्र, भाजपकडील सात स्वीकृत नगरसेवकांची नावे अद्याप अंतिम झालेली नसल्यामुळे या सभेत प्रत्यक्ष नियुक्ती होणार की प्रस्ताव पुन्हा एकदा तहकूब केला जाणार, याविषयी राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
18 Aug 2026 05:45 PM (IST)
भारत सरकारने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२५ ची घोषणा केली आहे. यावर्षी विविध खेळांमधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल एकूण १७ खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये ॲथलेटिक्समधील तेजस्विन शंकर, बुद्धिबळातील दिव्या देशमुख, बॅडमिंटनपटू गायत्री गोपीचंद आणि ट्रीसा जॉली, तसेच बॉक्सिंग, हॉकी, नेमबाजी आणि कबड्डी यांसारख्या विविध खेळांमधील खेळाडूंचा समावेश आहे. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने पुरस्कारांची यादी जाहीर करताना सांगितले की, दरवर्षी खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्थांना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.
18 Aug 2026 05:30 PM (IST)
एलपीजी सिलिंडरच्या तुलनेत कमी खर्च, सिलिंडर संपण्याची चिंता नसणे आणि घरपोच गॅस उपलब्ध होण्याची सुविधा यामुळे पुणेकरांचा पाइप नॅचरल गॅसकडे (पीएनजी) कल वाढत आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या (एमएनजीएल) माध्यमातून यंदा जानेवारी ते जुलैदरम्यान पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात तब्बल ७६ हजारांहून अधिक नवीन पीएनजी जोडण्या देण्यात आल्या आहेत. विशेषतः मार्चनंतर नवीन जोडण्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते
18 Aug 2026 05:14 PM (IST)
गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये भारत आणि जगाची जोडणी करण्यासाठी महाराष्ट्र हे प्रवेशद्वार आहे. भविष्यातील विविध क्षेत्रातील गरजा लक्षात घेता महाराष्ट्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन आणि विकास, डेटा सेंटर, ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर यासोबत पायाभूत सुविधांची परिसंस्था निर्माण करण्यात येत आहे. त्यामुळे समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी गुंतवणूकदारांचे महाराष्ट्र हे यशस्वी डेस्टिनेशन असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
18 Aug 2026 04:37 PM (IST)
शिवसेना फुटी आणि आमदार अपात्रता प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आज पार पडली असून उद्या पुन्हा यावर सुनवाई पार पडणार आहे. हि सुनावणी आता महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचली असून आज (मंगळवार, 18 ऑगस्ट ) ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर जोरदार युक्तिवाद केला.
यावेळी कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करत 'दहाव्या अनुसूचीनुसार काही आमदार किंवा खासदारांनी पक्ष सोडल्यास ते अपात्र ठरतात. मात्र, एखाद्या पक्षातील दोन तृतीयांश आमदार किंवा खासदार दुसऱ्या पक्षात विलीन झाल्यास त्यांना त्यानुसार संरक्षण मिळू शकते,' असा मुद्दा सिब्बल यांनी मांडला. शिवसेना फुटीच्या प्रकरणात मात्र शिंदे गटाने दुसऱ्या पक्षात विलीन होण्याऐवजी ‘आम्हीच शिवसेना आहोत’ असा दावा केला. याच मुद्द्यावर सिब्बल यांनी आक्षेप घेतला.
18 Aug 2026 04:27 PM (IST)
शहरात बेकायदा वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात महानगरपालिकेने आता मोर्चा उघडला आहे. अनधिकृत वैद्यकीय व्यवसायाला आळा बसावा यासाठी मनपाच्या आरोग्य विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. महापौर निता ठाकरे यांच्या निर्देशानंतर संशयित डॉक्टर, क्लिनिक आणि दवाखान्यांची तपासणी करून दोषींवर थेट कायदेशीर कारवाई करण्यासाठी विशेष छापेमारी पथके कार्यरत करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निर्देशांनुसार मनपास्तरावर विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत विभागीय वैद्यकीय अधिकारी, मलेरिया निरीक्षक, फार्मासिस्ट (औषध निर्माण अधिकारी), पोलीस निरीक्षक किंवा पोलीस पथक तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) प्रतिनिधींचा समावेश आहे.
18 Aug 2026 04:17 PM (IST)
मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी महासभेचे लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू करावे, या मागणीसाठी शहरातील समाजसेवकांनी महापालिका मुख्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. महासभेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या आंदोलनातून प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचे लक्ष नागरिकांच्या या मागणीकडे वेधण्यात आले. आंदोलकांनी यावेळी “देशाचे सर्वोच्च न्यायालय, लोकसभा आणि विधानसभा यांचे कामकाज जनतेला लाईव्ह पाहता येते, मग मिरा-भाईंदर महानगरपालिकेची महासभा लाईव्ह का नाही?” असा सवाल उपस्थित केला.
18 Aug 2026 04:05 PM (IST)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी FDA च्या कामगिरीचे कौतुक केले आहे. भेसळयुक्त पदार्थांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई आवश्यक असून, सध्या अशी कारवाई सुरू असल्याचा आनंद असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. यापुढेही FDA ची धडक कारवाई सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
18 Aug 2026 04:00 PM (IST)
पुण्यात आज रात्रीपासून जमावबंदी आदेश लागू
पुणे शहरात 14 दिवसांसाठी जमावबंदी आदेश
18 ऑगस्ट रात्री एक पासून ते 31 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंत आदेश असणार
18 Aug 2026 03:50 PM (IST)
डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंदुरे याला मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला. २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना डॉ. दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पुणे सत्र न्यायालयाने शरद कळसकर आणि सचिन अंदुरे या दोघांना दोषी ठरवून २०२४ मध्ये दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
18 Aug 2026 03:40 PM (IST)
जंतर मंतरवरील सीजेपी आंदोलनावेळी झालेल्या पोलीस कारवाई आणि इतर आरोपांची चौकशी करण्यासाठी सुप्रीम कोर्ट माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करणार आहे.
18 Aug 2026 03:30 PM (IST)
देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना एफडीएच्या कारवाईबाबत प्रश्न विचारले होते. त्यावर उत्तर देत मुख्यमंत्री म्हणाले की, मला असं वाटतंय राज्यात FDAकडून उत्तम कारवाई सुरू आहे. सगळ्यात पहिले तर फूड अडल्ट्रेशन किंवा कोणत्याही प्रकारचे मानक आहेत त्यांच्यावर जेव्हा कोणी प्रश्न उपस्थित करतात तेव्हा लोकांच्या जीवाला धोका असतो.
18 Aug 2026 03:20 PM (IST)
काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या उत्तराखंड येथील रामलीला मैदानात कार्यक्रमानंतर काही जणांनी त्या जागेचे शुद्धीकरण करून दलित समाजाचा अवमान केल्याच्या निषेधार्थ आज कोल्हापुरातील भीमशक्ती सामाजिक संघटना आक्रमक झाली आहे.
18 Aug 2026 03:12 PM (IST)
पुण्याच्या इंदापुरात मराठा समाज आक्रमक.... नवनाथ वाघमारेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी..... इंदापूर पोलीस ठाण्यासमोर मराठा तरुणांचा भर उन्हात ठिय्या नवनाथ वाघमारे यांनी मराठा समाजातील महिला आणि तरुणीबाबत वादग्रस्त विधान
18 Aug 2026 02:59 PM (IST)
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाखाली बनावट टेंडरची वर्क ऑर्डर देऊन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या गुन्ह्याचे मास्टरमाइंड संशयित तनय महाजन, नरेंद्र महाजन आणि शकील शेख हे तिघे असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तनयने बँक खात्यात 2 कोटी 72 लाख तर नरेंद्रने रोख स्वरूपात 36 लाख 50 हजार आणि शकीलने बँक खात्यात 86 लाख 50 हजार रुपये घेतल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
18 Aug 2026 02:50 PM (IST)
सीजेपीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी पुन्हा एकदा हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना भेटी देण्यास सुरुवात केली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी अभिजीत दिपके यांनी लिंबाळा एमआयडीसी शाळेला भेट दिली होती या शाळेमध्ये मुख्याध्यापक दारू पिऊन वर्गातच झोपत असल्याचा व्हिडिओ पुढे आला होता. दिपके यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना फोन करून तातडीने कार्यवाही करा, अशा सूचना दिल्या होत्या. प्रशासनानऽ या मुख्याध्यापकावरती निलंबनाची कार्यवाही केली.
18 Aug 2026 02:39 PM (IST)
डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंदुरेला मोठा दिलासा मिळाला आहे. त्याला जामीन मिळाला आहे. जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती मिळाली आहे.
18 Aug 2026 02:30 PM (IST)
नाशिकमधून मोठी बातमी समोर आली आहे. चांदवड तालुक्यात नाफेडच्या कांदा खरेदीत मोठा गैरव्यवहार उघडकीस आलाय. दक्षता समितीच्या तपासात गोदामांमध्ये 3 हजार 400 मेट्रिक टन कांदा सडलेला आढळलाय. नियम धाब्यावर बसवून निकृष्ट दर्जाचा कांदा खरेदी करण्यात आल्यानं सरकारची 6 ते 7 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
18 Aug 2026 02:21 PM (IST)
कोल्हापूर महापालिकेतील एका चोरीच्या घटनेने खळबळ उडाली आहे. मुख्य इमारतीत झालेल्या चोरीच्या घटनेमुळे महापालिकेच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ही चोरी पैशाची नव्हे तर काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते राजेश लाटकर यांच्या कार्यालयातच झाली असल्याचे समोर आली आहे. विरोधी नेत्यांच्या कार्यालयातील खुर्चा चोरीस जाण्याच्या प्रकाराने खळबळ उडाली. ही चोरी कोणा चोरट्याने नव्हे, तर कार्यालयातीलच कर्मचाऱ्याने केल्याचे सीसीटीव्हीतून उघड झाल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला.
18 Aug 2026 02:10 PM (IST)
राज्यभरात ठिकठिकाणी एफडीएकडून धडक कारवाई सुरु आहे. याबाबत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया देत भूमिका स्पष्ट केली. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी एफडीएच्या कारवाईचं कौतुक केलं. भेसळयुक्त पदार्थामुळे एखाद्याच्या जीवाला धोका असतो. त्यामुळे भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची आवश्यकता होती आणि ही कारवाई सध्या सुरु आहे, याचा मला आनंद आहे. तसेच यापुढेही एफडीएची अशी धडक कारवाई सुरु राहील, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.
18 Aug 2026 02:00 PM (IST)
म्हसवड नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी शासकीय निधीतून झालेल्या विविध विकास कामांचा दर्जा न तपासता त्या कामांची बिले काढून संबंधित ठेकेदारांना अदा केली असून शहराच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेवरुन चोरीस गेलेल्या मुद्देमालाची पोलीस तक्रारही न करता संबंधिताना मोकळे सोडले आहे, तर शासकीय निधीची नुसती उधळपट्टी केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर सोनवणे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत गुन्हा दाखल न केल्यास १९ ऑगस्ट पासून पालिकेच्या समोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
18 Aug 2026 01:55 PM (IST)
लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेयसीनेच आपल्या नवीन प्रियकराच्या मदतीने जोडीदाराचा गळा आवळून निघृण खून केल्याची धक्कादायक घटना इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह थेट कसारा घाटातील खोल दरीत फेकून देण्यात आला. मात्र, पोलिसांच्या तपासाच्या चक्रांपुढे हे थरारक हत्याकांड उघडकीस आले असून गुन्हे शाखा युनिट एक व इंदिरानगर पोलिसांनी मुख्य संशयित महिलेसह तिच्या साथीदाराला बेड्या ठोकल्या आहेत.
18 Aug 2026 01:45 PM (IST)
मागास जिल्ह्यांचा आर्थिक विकास करण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता मागास किंवा ग्रामीण भागात नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या आणि स्थानिकांना नोकरीवर ठेवणाऱ्या उद्योजकांना सरकारकडून विशेष आर्थिक मदत आणि सबसिडी दिली जाणार आहे. नक्की काय आहे ही योजना? योजनेचा फायदा कोणाला मिळणार, अर्ज कसा करावा आणि कोणत्या सवलती मिळणार, याबद्दलची सविस्तर माहिती घेऊयात.
18 Aug 2026 01:40 PM (IST)
भारतीय क्रिकेटपटू नितीश राणासाठी गेल्या काही दिवसांपासूनचा काळ खूप भावनिक आणि कठीण आहे. ११ ऑगस्ट रोजी त्यांच्या आईचे निधन झाले, ज्यामुळे संपूर्ण कुटुंब दुःखाने खचले. या दुःखात आणि तीव्र शोकातही, नितीश राणा जराही डगमगला नाही आणि त्याने नुकतीच एक दमदार खेळी केली. आईला गमावल्यानंतर काही तासांतच, त्याने मैदानात परतण्याचा कठीण निर्णय घेतला, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला.
18 Aug 2026 01:35 PM (IST)
धाबा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या किरमिरी व परिसरात मागील पाच दिवसापासून मादी बिबट्या आणि तिच्या पिल्लाचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याच्या हालचालींमुळे शेतकरी, शेतमजूर तसेच परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, वनविभागाने बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यासाठी आता मोठी शोधमोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत तब्बल १२५ वन कर्मचारी व विविध पथकांचा ताफा तैनात करण्यात आला.
18 Aug 2026 01:30 PM (IST)
राज्यातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणाची (SIR) गणना प्रक्रिया सोमवारी (17 ऑगस्ट) अंतिम टप्प्यात पोहोचली. याचसंदर्भात मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सकाळी १० वाजेपर्यंत जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात एकूण ९ कोटी ७८ लाख ५४ हजार ४९ मतदार आहेत. पैकी ७ कोटी ६९ लाख ५२ हजार २६२ मतदारांचे गणना अर्ज डिजिटाइझ झाले आहेत. ही संख्या एकूण मतदारांच्या ७८.६४ टक्के इतकी आहे. मात्र, तब्बल २ कोटी ७ लाख ९३ हजार ९१६ मतदारांचे म्हणजेच २१.२५ टक्के गणना अर्ज अद्याप जमा झाले नाहीत.
18 Aug 2026 01:25 PM (IST)
कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘जय जय स्वामी समर्थ’ सध्या उत्कंठावर्धक वळणावर पोहोचली आहे. अक्कलकोटच्या कथानकात आता मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार असून, शिवनाथ आणि राधाच्या बाळाभोवतीचं गूढ दिवसेंदिवस अधिकच गडद होत आहे. स्वामींना हे बाळ त्याच्या आई-वडिलांपासून दूर का करायचं आहे? बाळावर स्वामी स्वतःचा अधिक अधिकार का सांगत आहेत? या प्रश्नांची उत्तरं अद्याप गुलदस्त्यात आहेत.
18 Aug 2026 01:20 PM (IST)
भारताकडे किमान 35 हजार टन सोने आहे, त्याचे मूल्य देशाच्या जीडीपीच्या 115 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. असा मान मिळवणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे. गेल्या आठ वर्षांत, भारताची चालू खात्यातील तूट अंदाजे २५१ अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. याच काळात सोन्याची एकूण आयात ३५३ अब्ज डॉलर्सवर पोहोचली.
18 Aug 2026 01:15 PM (IST)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) पुन्हा एकदा पत्रकारावर संतापल्याने चर्चेत आले आहेत. ओव्हल ऑफिसमध्ये एका कार्यक्रमादरम्यान CNNच्या महिला रिपोर्टरने उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्याशी ट्रम्प यांच्या संबंधांबाबत प्रश्न विचारला. यावर ट्रम्प चांगलेच संतापले आणि त्यांनी रिपोर्टरला वारंवार ‘गप्प बस’ असे सुनावले.
18 Aug 2026 01:06 PM (IST)
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी जाहीर झालेल्या नव्या राष्ट्रीय टीममधून पक्षाच्या संघटनात्मक वाटचालीचे नवे संकेत मिळाले आहेत. जुन्या आणि अनुभवी चेहऱ्यांना मर्यादित स्थान देतानाच काही महत्त्वाच्या नेत्यांना बढती, काहींना नव्या जबाबदाऱ्या आणि काही चर्चित चेहऱ्यांना संघटनेबाहेरचा मार्ग दाखवण्यात आला आहे. त्यामुळे ही केवळ पदांची फेररचना नसून विविध राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका आणि २०२९च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आखलेल्या दीर्घकालीन संघटनात्मक रणनीतीचा भाग असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.
18 Aug 2026 12:48 PM (IST)
सलूनसमोर बसलेल्या १८ वर्षीय मजुराकडे पुडीसाठी पैशांची मागणी करुन पैसे न भेटल्याने चाकूने हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना गारखेडा परिसरातील गणेशनगरात घडली आहे. गोपी व त्याचा एक साथीदार अशी चाकूने हल्ला करणाऱ्यांची नावे असून त्यांच्याविरोधात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात कृष्णा बुद्धराम यादव (१८, रा. नवनाथ नगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, फिर्यादी हा १३ ऑगस्ट रोजी दुपारी ४:३० वाजता दुकानाबाहेर बसलेला असताना गोपी व त्याच्या साथीदाराने पुडी घेण्यासाठी १०० रुपये मागितले. माञ कृष्णा याने पैसे नकार देताच दोघांनी त्याला शिवीगाळ केली. त्यानंतर गोपीने गच्ची धरली तर त्याच्या साथीदाराने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याचवेळी गोपीने खिशातून चाकू काढून अंगावर धावून आला. कृष्णा याने चाकू पकडण्याचा प्रयत्न केला असता कृष्णाच्या डाव्या हाताची तीन बोटे कापली गेली. घाटीत उपचारांनंतर कृष्णा यादव याने पुंडलिकनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अंमलदार बावस्कर करीत आहेत.
18 Aug 2026 12:36 PM (IST)
पाटस-दौंड अष्टविनायक मार्गावर सोमवारी (दि. १७ ऑगस्ट) पहाटे साडेसहाच्या सुमारास भरधाव कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर रस्ता सोडून थेट पाटस हद्दीतील गार फाटा येथील लडकत यांच्या घरासमोरील नर्सरीत घुसला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, नर्सरीतील झाडे, रोपे व साहित्याचे मोठे नुकसान झाल्याने लडकत कुटुंबाचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. दौंडच्या दिशेने पाटसकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरवरील चालकाचे गार फाटा परिसरात अचानक नियंत्रण सुटले. त्यानंतर कंटेनर रस्त्यालगत असलेल्या लडकत यांच्या घरासमोरील झाडे-फुलांच्या नर्सरीत घुसला. पहाटेच्या शांत वातावरणात कंटेनर आदळल्याचा मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ घबराट पसरली. नागरिकांनी घराबाहेर येऊन पाहिले असता कंटेनर नर्सरीत घुसल्याचे दिसून आले. अपघातावेळी कंटेनरचा वेग मोठा असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, घरासमोरील करंजीचे झाड कंटेनरच्या मार्गात आल्याने त्याचा वेग काही प्रमाणात कमी झाला. त्यामुळे कंटेनर थेट घरात न घुसता नर्सरीच्या आवारातच थांबला. करंजीचे झाड नसते तर कंटेनर थेट घरात घुसून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती, अशी भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.
18 Aug 2026 12:24 PM (IST)
केशवनगर-खराडी उड्डाणपुलाचे रविवार, १६ ऑगस्ट रोजी उद्घाटन करण्यात आले. केशवनगर-खराडी पूल, गोदरेज इन्फिनिटी जवळ, केशवनगर, मुंढवा येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर हा उड्डाणपूल नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. या उड्डाणपुलाला दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांना निवेदन दिले आहे. पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अजितदादा पवार यांनी पायाभूत सुविधा आणि वाहतूक प्रकल्पांना प्राधान्य दिले आहे. त्यांच्या विकासाभिमुख कार्याची आठवण कायम राहावी, या उद्देशाने उड्डाणपुलाला त्यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आल्याचे सुरवसे पाटलांनी सांगितले आहे. या उड्डाणपुलाची लांबी सुमारे ४११ मीटर असून रुंदी २४ मीटर आहे. पुलावरून दोन्ही दिशेने वाहतूक सुरू राहणार आहे. अजितदादांच्या पुणे शहराच्या विकासातील योगदानाचा सन्मान म्हणून उड्डाणपुलाचे ‘दिवंगत अजितदादा पवार उड्डाणपूल’ असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे.
18 Aug 2026 12:12 PM (IST)
पुणे पोलिसांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. पोलिसांच्या निर्णयामुळे एकच खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांनी संपूर्ण पुणे शहरासाठी 14 दिवसांसाठी जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. 4 लोक एकत्र आले तर कारवाई होणार आहे. सुरक्षेच्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी जमावबंदीचा आदेश जारी केला आहे. पुणेकरांनी आता गर्दी करताना जरा जपूनच पाऊल टाकावे लागणार आहे. आगामी सण, राजकीय कार्यक्रम आणि संभाव्य आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात १८ ते ३१ ऑगस्टदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.
18 Aug 2026 11:44 AM (IST)
भारतीय संघाने कसोटीच्या पहिल्या डावात श्रीलंकेला २८४ धावांवर गुंडाळले. यात मानव सुथारने सर्वात मोठे योगदान दिले. संघात रवींद्र जडेजा असूनही, भारताने आणखी एका डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाला संधी दिली. मानवने आपल्या स्पेलमध्ये ७६ धावांत ४ बळी घेत, त्या डावातील भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. अफगाणिस्तानविरुद्ध पदार्पण केल्यानंतर, मानव सुथारचा हा केवळ दुसरा कसोटी सामना होता. त्याने आपल्या पहिल्याच चेंडूवर अनुभवी दिनेश चंडीमालला बाद केले.
18 Aug 2026 11:35 AM (IST)
सण आणि सुट्टयांदरम्यान विमान भाड्यात होणाऱ्या प्रचंड वाढीवर सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, जर विमान कंपन्या प्रस्थापित नियमांचे पालन करत नसतील, तर त्यांनी उड्डाणे थांबवली पाहिजेत. प्रवाशांच्या फायद्यासाठी एक प्रणाली स्थापित केली असली तरी, तिची अंमलबजावणी आणि नियमनाबाबतची परिस्थिती अजूनही अस्पष्ट असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
18 Aug 2026 11:25 AM (IST)
मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यातील मेहरा बुजुर्ग गावातून ६ वर्षांच्या मुलाच्या हत्येची एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर येत आहे. या हत्याकांडाचे सत्य बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी दोन महिन्यांचा कालावधी लागला पण अखेर यामागील मास्टरमाईंड समोर आला. चिमुकल्याच्या हत्येची आरोपी त्याची आईच असून कथितरित्या आपल्या प्रेमीसोबत मिळून तिने मुलाच्या हत्येचा कट रचला. पोलिसांच्या मते, दोघांनी आपले अनैतिक संबंधाचा खुलासा होऊ नये आणि समाजात बदनामीच्या भितीने चिमुकल्याची हत्या केली. या प्रकरणात दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून लवकरच आरोपी आणि तिच्या प्रियकरावर योग्य ती कायदेशीर कारावाई केली जाणार आहे.
18 Aug 2026 11:20 AM (IST)
१५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणातील एका शब्दाने सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडाली आहे. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भाषणादरम्यान “दिमागी नक्षल” या शब्दांचा उच्चार केला होता. या शब्दांवरुन चर्चा सुरू झाल्यानंतर आता इन्स्टाग्रामवर ‘दिमागी नक्षल’ नावाचे अकाऊंट सुरू करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी च्या भाषणानंतर अवघ्या ४८ तासांत हे अकाऊंट सुरू करण्यात आले असून आतापर्यंत हँडलने १.८५ लाख फॉलोअर्स मिळवले आहेत. त्यामुळे पंतप्रधानांच्या या वक्तव्याचे बुमरँग झाल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
18 Aug 2026 11:15 AM (IST)
गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यातच लातूर जिल्ह्यात अंधश्रद्धा आणि कथित काळ्या जादूशी संबंधित एक खळबळजनक प्रकरण उघडकीस आले आहे. पैशांचा वर्षाव होईल, या अंधश्रद्धेच्या आशेने एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला विवस्त्र करून तिच्याकडून अघोरी पूजा करवण्याचा कट रचण्यात आल्याचा आरोप आहे. मात्र, ही घटना घडण्यापूर्वीच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी हा कट उघडकीस आणून अल्पवयीन मुलीची सुटका केली.
18 Aug 2026 11:05 AM (IST)
बांगलादेशविरुद्ध मायदेशात झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर ऑस्ट्रेलियाला आणखी एका धक्क्याला सामोरे जावे लागू शकते. बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला मायदेशात पहिल्यांदाच पराभूत केले आहे. बांगलादेशविरुद्धच्या पराभवाव्यतिरिक्त, ऑस्ट्रेलियाने आयसीसीच्या ओव्हर-रेट नियमांचे उल्लंघन केल्याचेही आढळून आले आहे. तथापि, ऑस्ट्रेलियन संघावर कारवाई करायची की नाही, हे आयसीसीने अद्याप ठरवलेले नाही.
18 Aug 2026 11:00 AM (IST)
UGC-NET 2026: अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून जून २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या युजीसी-नेट परीक्षेतील इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या तीन विषयांची पुनर्परीक्षा तसेच या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये तथ्यात्मक, मुद्रणविषयक, भाषांतरासंबंधी तसेच भाषिक स्वरूपाच्या गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांमध्ये अशा स्वरूपाच्या चुका आढळणे ही अत्यंत गंभीर बाब असून, त्यामुळे संपूर्ण परीक्षा व्यवस्थेच्या गुणवत्ता आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचा आरोप आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) केला आहे.
18 Aug 2026 10:55 AM (IST)
लातूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यातच लातूर जिल्ह्यात अंधश्रद्धा आणि कथित काळ्या जादूशी संबंधित एक खळबळजनक प्रकरण उघडकीस आले आहे. पैशांचा वर्षाव होईल, या अंधश्रद्धेच्या आशेने एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला विवस्त्र करून तिच्याकडून अघोरी पूजा करवण्याचा कट रचण्यात आल्याचा आरोप आहे. मात्र, ही घटना घडण्यापूर्वीच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी हा कट उघडकीस आणून अल्पवयीन मुलीची सुटका केली.
18 Aug 2026 10:45 AM (IST)
बांगलादेशविरुद्ध मायदेशात झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर ऑस्ट्रेलियाला आणखी एका धक्क्याला सामोरे जावे लागू शकते. बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला मायदेशात पहिल्यांदाच पराभूत केले आहे. बांगलादेशविरुद्धच्या पराभवाव्यतिरिक्त, ऑस्ट्रेलियाने आयसीसीच्या ओव्हर-रेट नियमांचे उल्लंघन केल्याचेही आढळून आले आहे. तथापि, ऑस्ट्रेलियन संघावर कारवाई करायची की नाही, हे आयसीसीने अद्याप ठरवलेले नाही.
18 Aug 2026 10:35 AM (IST)
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक महान नेते आणि अफाट साहसी क्रांतिकारक म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांनी ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा!’ या ओघवत्या घोषणेने संपूर्ण देशवासीयांमध्ये स्वातंत्र्याची नवी ज्योत पेटवली. ब्रिटिशांना त्यांच्याच देशात जाऊन सळो की पळो करून सोडण्यासाठी त्यांनी ‘आझाद हिंद फौजेची’ पुनर्रचना आणि यशस्वी नेतृत्व केले. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले आणि ‘जय हिंद’चा नारा देत भारतीयांच्या मनात देशभक्तीची अखंड ज्योत निर्माण केली. त्यांचे हे असीम त्याग, देशप्रेम आणि राष्ट्रनिष्ठा आजही प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे.
18 Aug 2026 10:25 AM (IST)
व्हायरल फोटोंची सत्यता तपासल्यानंतर हे फोटो AI-जनरेटेड असल्याचे नेटकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे नयनताराने प्रत्यक्षात टक्कल केलेले नसल्याचे स्पष्ट होते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या AI फोटोंमुळे पुन्हा एकदा सेलिब्रिटींच्या बाबतीत पसरवल्या जाणाऱ्या खोट्या माहितीचा मुद्दा समोर आला आहे.






