महाकुंभदरम्यान प्रयागराजमधील गंगेचे पाणी स्नानासाठी योग्य होते. (फोटो - istock)
प्रयागराज : उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरु आहे. 144 वर्षांनंतर होणाऱ्या या महाकुंभमेळ्यासाठी कोट्यवधी लोक प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत. संगमावर स्नान करण्यासाठी देशासह परदेशातील लोक देखील येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यापासून अनेक राजकीय नेत्यांनी महाकुंभमेळ्यामध्ये स्नान केले आहे. गंगेमध्ये आत्तापर्यंत कोट्यवधी लोकांनी स्नान केले असून अजूनही भाविक दाखल होत आहेत. मात्र हे स्नान करत असलेले पाणी अंघोळीसाठी चांगले नसल्याचा अहवाल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB)ने दिला आहे. या धक्कादायक अहवालामुळे सर्वांना धक्का बसला आहे.
महाकुंभ 13 जानेवारीपासून सुरू झाला होताह. आता येत्या आठ दिवसांमध्ये महाकुंभमेळा संपणार आहे. 26 फेब्रुवारी रोजी महाकुंभमेळा संपेल. आतापर्यंत दिलेल्या माहितीनुसार, महाकुंभात 54 कोटींहून अधिक लोकांनी स्नान केले आहे. महाकुंभाच्या समारोपापूर्वी, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणकडे म्हणजेच NGT ला एक धक्कादायक अहवाल सादर केला आहे. यामध्ये संगमाचे पाणी सुरक्षित नसल्याचे सांगण्यात आले आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने गंगेच्या पाण्याच्या गुणवत्तेचा एनजीटीला अहवाल सादर केला आहे. या अहवालामध्ये महाकुंभमेळ्यादरम्यान प्रयागराजमध्ये फेकल कोलिफॉर्म बॅक्टेरियाचे प्रमाण वाढले आहे, ज्यामुळे नदीत प्रदूषणाच्या पातळीत वाढ दिसून आली आहे. महाकुंभमेळ्यादरम्यान प्रयागराजमधील विविध ठिकाणी असलेल्या फेकल कॉलिफॉर्मचे प्रमाण आंघोळीसाठी प्राथमिक पाण्याच्या गुणवत्तेसाठी योग्य नसल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात म्हटले आहे की, सांडपाण्याच्या प्रदूषणाचे सूचक असलेल्या फेकल कॉलिफॉर्मची स्वीकार्य मर्यादा प्रति १०० मिली २५०० युनिट्सपर्यंत वाढली आहे. प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नद्यांमध्ये सांडपाण्याचा प्रवाह थांबवण्याच्या प्रकरणाची सुनावणी एनजीटी करत आहे. २०२५ च्या महाकुंभमेळ्यासाठी सांडपाणी व्यवस्थापन योजना तयार करण्याचे निर्देश एनजीटीने यूपी सरकारला दिले होते.
एनजीटीने डिसेंबर २०२४ मध्ये हा आदेश दिला होता. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (NGT) डिसेंबर २०२४ मध्ये आदेश दिला होता की भाविकांना ते ज्या पाण्यात स्नान करणार आहेत त्या पाण्याच्या गुणवत्तेची माहिती देण्यात यावी. तथापि, ही माहिती अद्याप दिली जात नाही. महाकुंभमेळ्यादरम्यान प्रयागराजमध्ये गंगाजलाची पुरेशी उपलब्धता असावी आणि हे पाणी पिण्यासाठी आणि आंघोळीसाठी सुरक्षित असावे, असे एनजीटीने म्हटले होते. मात्र प्रत्यक्षात हे पाणी सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे.
यापूर्वी 2019 मध्ये कुंभमेळ्यावेळी पाण्याची गुणवत्ता खराब असल्याचे आढळून आले होते. गंगेच्या पाण्याबाबत गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित होण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यावेळी, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) अहवालात असे म्हटले होते की, अमृतस्नानाच्या दिवशीही पाण्याची गुणवत्ता खराब होती. अहवालानुसार, करसर घाटातील पाण्यात बीओडी (जैविक ऑक्सिजन मागणी) आणि फेकल कॉलिफॉर्मची पातळी मानकांपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले. विशेषतः, मुख्य आंघोळीच्या वेळी सकाळी पाणी संध्याकाळपेक्षा जास्त प्रदूषित होते.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शिवाय, महाशिवरात्री आणि त्यानंतरच्या दिवसांमध्ये पाण्यातील फेकल कॉलिफॉर्मचे प्रमाण देखील मानकांपेक्षा जास्त होते. यमुना नदीतील विरघळलेल्या ऑक्सिजनची पातळी सर्व मानकांमध्ये होती, परंतु तिचे पीएच, बीओडी आणि मल कोलिफॉर्म पातळी बहुतेकदा स्वीकार्य मर्यादेबाहेर होती. गंगेच्या उपनद्यांमध्ये काली नदी सर्वात प्रदूषित असल्याचे आढळून आले.