मुझफ्फरपूर : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी बिहारमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. तिकीट नाकारण्यात आल्याने संतापलेल्या बिहारमधील मुझफ्फरपूरचे खासदार अजय निषाद यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे. याची घोषणा त्यांनी सोशल मीडियावर केली. त्यानंतर काही वेळातच त्यांनी दिल्लीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आपली फसवणूक झाल्याचे अजय निषाद यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना सांगितले. त्यामुळे भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे.
#WATCH | Delhi | Sitting Lok Sabha MP Ajay Nishad joins the Congress, shortly after resigning from the BJP. pic.twitter.com/8DEoJwUZg6 — ANI (@ANI) April 2, 2024
आता काँग्रेस त्यांना मुझफ्फरपूरमधून लोकसभेचे उमेदवार बनवू शकते. या निवडणुकीत भाजपाने अजय निषाद यांचे तिकीट रद्द केले होते. त्यांच्या जागी रामभूषण निषाद यांना मुझफ्फरपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. याचा अजयला राग आला. खासदार अजय निषाद यांनी मंगळवारी दिल्लीतील काँग्रेस कार्यालयात पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. यावेळी बिहार काँग्रेसचे अध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंह, प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश आणि इतर नेते उपस्थित होते.
दरम्यान, काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर अजय निषाद यांनी पक्ष मजबूत करण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले. मात्र, मुझफ्फरपूरमधून त्यांच्या उमेदवारीबाबत मंगळवारी कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. अजय निषाद यांच्यानंतर सासारामचे भाजप खासदार छेडी पासवान काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात आहेत. काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात. काँग्रेस त्यांना सासाराममधूनही तिकीट देऊ शकते.






