'या' दोन राज्यांना हायअलर्ट,`दाना`चक्रीवादळ कुठे धडकणार ? (फोटो सौजन्य-X)
बंगालच्या उपसागरात उगम पावलेले दाना हे चक्रीवादळ ओडिशातील भितरकनिका राष्ट्रीय उद्यान आणि धामरा बंदराजवळ उतरेल. दरम्यान ओडिशा आणि पश्चिम बंगाल चक्रीवादळ ‘दाना’ संदर्भात हाय अलर्टवर आहेत. ओडिशाच्या किनारपट्टी भागात गुरुवारी (24 ऑक्टोबर) सकाळी जोरदार पाऊस आणि वादळी वारे वाहत होते. ओडिशातील समुद्र किनाऱ्यालगतची परिस्थिती आधीच बिकट दिसत होती की, समुद्रावर उंच लाटा उसळत होत्या आणि जोरदार वारे वाहत होते. कारण ‘दाना’ किनारपट्टीच्या अगदी जवळ पोहोचला आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) ने सांगितले की चक्रीवादळ ‘दाना’ शुक्रवारी सकाळी ओडिशातील भितरकनिका राष्ट्रीय उद्यान आणि भद्रक जिल्ह्यातील धामरा बंदरात पोहोचण्याची शक्यता आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी 120 किलोमीटरपर्यंत असू शकतो.
बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेले हे चक्रीवादळ ‘दाना’ सोबतच धोका घेऊन येत आहे. ओडिशा आणि पश्चिम बंगाल हाय अलर्टवर असताना, झारखंड, आंध्र प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांनाही सतर्कतेवर ठेवण्यात आले आहे. समुद्र परिसरातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. तसेच एनडीआरएफच्या ५६ तुकड्या ठिकठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. गेल्या सहा तासांत दाना ताशी 12 किमी वेगाने उत्तर-पश्चिम दिशेने सरकत असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
हवामान विभागाकडून ‘दाना’वर चक्रीवादळामुळे किनारपट्टीवरील नागरिकांना सर्तकतेचा इशारा दिला आहे. यासंदर्भात विभागाने एक परिपत्रक जारी केले असून 24 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून 25 ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत दाना चक्रीवादळ उत्तर-पश्चिम दिशेने सरकणार असल्याने ते उत्तरेकडील किनारपट्टीला धडकेल. ओडिशा आणि पश्चिम बंगाल पुरी आणि सागर बेटाच्या दरम्यान ओलांडण्याची शक्यता आहे. या वेळी वाऱ्याचा वेग ताशी 100-110 किमी असू शकतो.
तर भुवनेश्वरच्या प्रादेशिक हवामान केंद्राच्या संचालक मनोरमा मोहंती यांनी सांगितले की, चक्रीवादळ ‘दाना’ पश्चिम आणि पश्चिम-दक्षिण दिशेने सरकण्याची शक्यता आहे, ज्यामुळे 26 ऑक्टोबरच्या सुमारास दक्षिण ओडिशात पाऊस पडू शकतो. मात्र, भूस्खलनाची शक्यता नाही आणि वाऱ्याच्या वेगाच्या अंदाजात कोणताही बदल झाला नाही. त्याचबरोबर ‘दाना’च्या आवाजाने झाडे उन्मळून पडली आहेत. बालासोर, भद्रक, भितरकनिका आणि पुरीच्या काही भागात रस्ते अडवण्यात आल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.
‘दाना’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर NDRF ने ओडिशा आणि पश्चिम बंगालसह पाच राज्यांमध्ये एकूण 56 टीम तैनात केल्या आहेत. ओडिशात 20 संघ तैनात आहेत. त्यापैकी एक राखीव आहे, तर पश्चिम बंगालमध्ये 17 पैकी 13 संघ राखीव आहेत. एनडीआरएफ व्यतिरिक्त संबंधित राज्याची एसडीआरएफ टीम या भागात तैनात आहे. एनडीआरएफने आंध्र प्रदेश आणि झारखंडमध्ये प्रत्येकी नऊ टीम तैनात केल्या आहेत, तर छत्तीसगडमध्ये एक टीम, कारण चक्रीवादळ आल्यानंतर या राज्यांमध्ये अतिवृष्टी आणि पूरस्थिती निर्माण होऊ शकते.
इंडियन कोस्ट गार्ड (ICG) ने सांगितले की ते हाय अलर्टवर आहे आणि बंगालच्या उपसागरावरील कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला त्वरित प्रतिसाद देण्यासाठी जहाजे आणि विमाने तैनात केली आहेत. दरम्यान, एनडीआरएफने सांगितले की, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी त्यांनी दक्षिण बंगालमध्ये अनेक पथके तैनात केली आहेत.
दाना चक्रीवादळामुळे भुवनेश्वरमधील बिजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळावरील उड्डाण संचालन गुरुवारपासून म्हणजे आज संध्याकाळपासून १६ तासांसाठी स्थगित करण्यात येणार आहे. जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, चक्रीवादळ दानामुळे विमानतळाचे कामकाज 24 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5 ते 25 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत बंद राहील. अधिकाऱ्यांनी सांगितले की, भुवनेश्वर विमानतळावर दररोज १०० हून अधिक उड्डाणे चालतात, ज्यामध्ये सुमारे १५ हजार लोक प्रवास करतात.
तसेच या चक्रीवादळामुळे पूर्व रेल्वे आपल्या सियालदह विभागात गुरुवारी रात्री 8 ते शुक्रवारी सकाळी 10 वाजेपर्यंत 190 लोकल गाड्या चालवणार नाही. दक्षिण पूर्व रेल्वेने मंगळवारी घोषणा केली होती की, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर त्याच्या प्रदेशातून धावणाऱ्या 150 हून अधिक एक्स्प्रेस आणि पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पूर्व रेल्वेने मंगळवारीच आपल्या भागातून जाणाऱ्या सुमारे 198 गाड्या रद्द केल्या होत्या.