संग्रहित फोटो
या प्रकरणी पौड पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस फौजदार सचिन बाळासाहेब शिंदे (वय ४६, रा. ग्रीन फ्लाॅरेन्झा सोसायटी, सूस, ता. मुळशी) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराविरुद्ध पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गु्न्ह्यात जप्त केलेली गाडी परत करणे, तसेच तपासात मदत करण्यासाठी सहायक फौजदार शिंदे यांनी एक लाख रुपयांची लाच मागितली होती.
याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिली होती. तक्रारीची पडताळणी करण्यात आली. तक्रारदाराने तडजोडीत ३५ हजार रुपयांची लाच देण्याचे मान्य केले. त्यानंतर पौड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या मुळशी चौकीच्या परिसरात शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सापळा लावण्यात आला. तक्रारदाराकडून ३५ हजारांची लाच घेताना शिंदे यांना सायंकाळी पकडण्यात आले. रात्री उशीरा पौड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करुन शिंदे यांना अटक करण्यात आली आहे.






