दिल्ली ते पटना आता फक्त अडीच तासांत; विमानासारखी वेगात असेल 'ही' नवी ट्रेन (File Photo : Bullet Train)
नवी दिल्ली : वंदे भारत, दुरांतो, शताब्दी एक्सप्रेस यांसारख्या अनेक वेगवान रेल्वेगाड्या सध्या कार्यरत आहेत. भारतात पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी सतत प्रयत्न केले जात आहेत. विशेषतः रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांमध्ये लाखो कोटी रुपये गुंतवले जात आहेत. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचाही या प्रमुख योजनांमध्ये समावेश आहे. त्यानंतर आता अशी एक ट्रेन येतीये जी अवघ्या अडीच तासांत दिल्ली ते पटना अंतर पार करू शकेल.
येत्या काही महिन्यांत देशातील पहिली बुलेट ट्रेन त्याच्या मार्गावर धावताना दिसू शकते. हाय-स्पीड ट्रेनबाबत आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. जर सर्व काही योजनेनुसार व्यवस्थित झाले तर भारतात पुढील पिढीच्या बुलेट ट्रेनचे कार्य सुरू होऊ शकते. यासाठी भारत जपानसोबत करार करण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जपानच्या दौऱ्यावर आहेत आणि या काळात भारतात E10 शिंकानसेन बुलेट ट्रेनच्या निर्मितीबाबत दोन्ही देशांमध्ये करार होण्याची अपेक्षा आहे.
भारत आणि जपान लवकरच नवीन पिढीची E-10 शिंकानसेन बुलेट ट्रेन विकसित करू शकेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दोन दिवसांच्या जपान दौऱ्यादरम्यान ही घोषणा केली जाऊ शकते. दोन्ही देशांनी या भागीदारीसाठी तत्वतः करार केला आहे. E-10 शिंकानसेन जपानच्या ALFA-X ट्रेनवर आधारित असणार आहे. मात्र, ती भारतीय परिस्थितीनुसार अनुकूलित केली जाईल.
रेल्वे प्रकल्पाला बळकटी मिळेल
हे पाऊल भारत-जपान अहमदाबाद-मुंबई हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाला आणखी बळकटी देईल. हा एकूण ५०८ किमी लांबीचा प्रकल्प आहे, ज्याचा पहिला ५० किमी भाग २०२७ पर्यंत गुजरातमध्ये कार्यान्वित होण्याची शक्यता आहे, तर संपूर्ण प्रकल्प २०२९ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
वेग 400 किमी प्रति तास
या प्रकल्पाचा आकार आणि धोरणात्मक महत्त्व खूप मोठे आहे. पंतप्रधान मोदींच्या पुढाकाराचे आणि जपानशी असलेल्या त्यांच्या खोल संबंधांचे परिणाम म्हणजे आता बुलेट ट्रेन थेट भारतात विकसित होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. नवीन E-10 शिंकानसेन ट्रेनचा कमाल वेग ताशी 400 किमी असेल, असेही सांगण्यात आले आहे.