चंदीगड : मिहिर भोज (Mihir Bhoj Statue) यांच्या पुतळ्याच्या अनावरणावरून गुज्जर आणि राजपूत समाजातील संघर्षांचा परिणाम हरियाणा भाजपवरही दिसून येत आहे. कैथलमधील भाजपच्या सर्व राजपूत नेत्यांनी आपले राजीनामे पक्षाकडे पाठवले आहे. जोपर्यंत राजपूत नेत्यांवर लाठीचार्ज का करण्यात आला, याचे स्पष्टीकरण मिळत नाही, तोपर्यंत त्यांचा भाजपाशी कोणताही संबंध नसल्याचे त्यात नमूद केले आहे.
भाजप किसान मोर्चाचे नेते संजीव राणा म्हणाले, ‘आमचे लोक शांततेने बोलत होते, आमचा विरोध शांततेत होता. परंतु प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दिशाभूल करण्यासाठी आणि आंदोलन चिघळवण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. आमचे अनेक तरुण जखमी झाले आहेत. आमच्या समाजाने काय गुन्हा केला?, याचे उत्तर आम्हाला हवे आहे.
महापुरुषाला हिंदू सम्राट लिहिणे गुन्हा आहे का?
36 समाजाला सोबत घेणारा सम्राट असलेल्या महापुरुषाला हिंदू सम्राट लिहिणे हा गुन्हा आहे का? असा सवाल उपस्थित करत राणा पुढे म्हणाले, जर हा गुन्हा असेल तर आम्ही तो पुन्हा पुन्हा करू, ते कोणत्याही एका समाजाचे नाहीत, ते 36 समाजाचे नेते आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना हिंदूसम्राट संबोधण्याबाबत बोललो. त्यांना राजपूत, गुज्जर संबोधू नका, जाती-जातीत फूट पाडू नका, असे आम्ही म्हणालो होतो. मात्र, त्यावरही आक्षेप घेतला. याचा अर्थ ते स्वतःला सर्वेक्षक समजत आहेत का? असा सवालही त्यांनी केला.
मुख्यंमत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे
राणा पुढे म्हणाले, आमच्या लोकांवर लाठीमार का झाला, त्यांनी कोणता गुन्हा केला? यावर जोपर्यंत मुख्यंमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्याकडून आमच्या मुद्यावर स्पष्टीकरण येत नाही, तोपर्यंत आम्ही यावर ठाम आहोत. कैथलमधील भाजपाशी संबंधित सर्व नेते आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे राजीनामे दिले आहेत. जोपर्यंत आम्हाला याबाबत स्पष्टीकरण मिळत नाही, तोपर्यंत आमचा भाजपशी काहीही संबंध नाही.