अंदमान – उत्तर भारतात (North India) काल पहाटेच्या सुमारास दोन भूकंपाचे (Earthquake) धक्के बसले. यामुळे भारतात किरकोळ नुकसान झाले असून भूकंपाचे केंद्रबिंदू असलेल्या नेपाळमध्ये (Nepal) सहा जणांचा मृत्यू झाला. तर आज रात्री अंदमान-निकोबार बेटांवरही भूकंप झाला असून अद्याप कोणतीही हानी झालेली नाही.
अंदमान-निकोबार बेटांवर (Andaman and Nicobar Island) गुरुवारी पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार (National Center for Seismology) अंदमान आणि निकोबार बेटांमधील पोर्ट ब्लेअरच्या भागात आज रात्री २:२९ वाजता ४.४ तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाची खोली जमिनीखाली १० किमी होती.
या भूकंपामुळे कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. यापूर्वी २ आणि ३ सप्टेंबर रोजी अंदमान-निकोबार बेटांवर भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर अनुक्रमे ४.९ आणि ४.४ इतकी मोजली गेली होती. याच्या एक दिवस आधी, म्हणजेच ९ नोव्हेंबरला पहाटे १:५८ च्या सुमारास दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.३ मोजली होती. त्याचा केंद्र नेपाळमध्ये होता.