
जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी
श्रीनगर : गेल्या वर्षभरात जम्मू आणि काश्मीरमध्ये कुठलाही मोठा दहशतवादी हल्ला करण्यात दहशतवादी संघटना अयशस्वी ठरल्या. मात्र, आता याच दहशतवादी संघटना पहलगाम हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त एक मोठी घटना घडवू आणू शकतात. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांकडून जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गेल्या आठवड्यात पाकिस्तानी लष्कर आणि त्यांची गुप्तचर संस्था, आयएसआय यांनी अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज असलेल्या दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत सुरक्षितपणे घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सुरक्षा यंत्रणांना वेळीच समजल्याने हा नियोजित हल्ला सुरक्षा दलांनी हाणून पाडला. गुप्तचर यंत्रणांच्या इशाऱ्यानंतर राज्यभरातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला असून, कोणताही दहशतवादी कट उधळून लावण्यासाठी व्यापक व्यवस्था करण्यात आली आहे.
सुरक्षा व्यवस्थेत आवश्यक बदल
दहशतवादी संघटनांकडून रचला जात असलेला कट उधळून लावण्यासाठी सर्व सुरक्षा यंत्रणा आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला असून, त्यात आवश्यक बदल केले आहेत. सर्व सुरक्षा दलांना प्रतिबंधात्मक कारवाईच्या धोरणांतर्गत दहशतवादविरोधी कारवाया करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यांनी माहिती दिली की, गेल्या आठवड्यात दक्षिण काश्मीरमध्ये दोन शक्तिशाली आयईडी जप्त करण्यात आले असून, पहलगाम हल्ल्याच्या वर्षपूर्तीच्या जवळपास दहशतवाद्यांकडून त्यांचा वापर केला जाणार होता.
किश्तवाडमध्ये झाली होती चमकम
दुसरीकडे, काही दिवसांपूर्वीच जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. महत्त्वाची बाब म्हणजे, सुरक्षा रक्षकांनी या चकमकीत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा कमांडर सैफुल्लाह याला सुरक्षा दलांनी घेराव घातला होता. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार गोळीबार झाला. किश्तवाडमधील अत्यंत संवेदनशील भागात हा गोळीबार झाला. या भागात सातत्याने दहशतवादी घुसखोरीचे प्रयत्न होत असतात. मात्र, सुरक्षा यंत्रणांमुळे त्याला लगाम लागताना दिसत आहे.