Purnendu Tiwari : कतारच्या तुरुंगात बंद माजी नौदल अधिकाऱ्याच्या प्रकृतीची भारताला चिंता; वैद्यकीय माहिती मागवली, सौजन्य : आयएएनएस
Purnendu Tiwari : कतारमध्ये कोठडीत असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कमांडर पूर्णेंदू तिवारी यांच्या प्रकृतीबाबत भारत सरकारने चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या आरोग्याची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी भारत कतारच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून, त्यांना कोणत्याही वैद्यकीय उपचारांची गरज असल्यास योग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही भारताने केली आहे.
नवी दिल्लीत शुक्रवारी आयोजित नियमित पत्रकार परिषदेत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी ही माहिती दिली. पूर्णेंदू तिवारी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याच्या वृत्तांवर प्रतिक्रिया देताना जायसवाल म्हणाले की, त्यांच्या प्रकृतीसंदर्भातील काही माध्यमांतील वृत्ते भारत सरकारच्या निदर्शनास आली आहेत. त्यानंतर कतारच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीची माहिती मागवण्यात आली आहे.
पूर्णेंदू तिवारी यांना कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय मदतीची आवश्यकता असल्यास त्यांना योग्य उपचार आणि सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी विनंती आम्ही कतारच्या अधिकाऱ्यांना केली आहे. त्यांना अलीकडेच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे जायसवाल यांनी सांगितले.
कमांडर पूर्णेंदू तिवारी यांना मदत करण्यासाठी भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून, त्यांच्या कुटुंबीयांशी तसेच कतारच्या अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यापूर्वीही परराष्ट्र मंत्रालयाने पूर्णेंदू तिवारी यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात असल्याचे सांगितले होते. त्यांना आवश्यक ती सर्व मदत दिली जात असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले होते. मात्र, त्यांच्याशी संबंधित वेगवेगळ्या कायदेशीर प्रकरणांची एकमेकांशी गल्लत करू नये, असेही भारताने नमूद केले होते.
एप्रिलमध्ये पत्रकार परिषदेत पूर्णेंदू तिवारी यांना आर्थिक अनियमिततेशी संबंधित एका प्रकरणात दिलासा मिळूनही ते तुरुंगात का आहेत, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर रणधीर जायसवाल यांनी दोन्ही प्रकरणे वेगवेगळी असल्याचे सांगितले होते.
फेब्रुवारी २०२६ मध्ये कतारच्या ‘कोर्ट ऑफ कॅसेशन’ने कमांडर पूर्णेंदू तिवारी, ओमानमधील एका मालकासह कतारच्या अन्य एका अधिकाऱ्याला शिक्षा सुनावली होती. मार्चमधील न्यायालयाचा निर्णय हा वेगळ्या प्रकरणाशी संबंधित होता आणि त्यात तिवारी यांना दिलासा मिळाला होता. सध्या ते फेब्रुवारीमध्ये निकाल दिलेल्या प्रकरणात कोठडीत असल्याचे जायसवाल यांनी स्पष्ट केले होते.
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील रहिवासी असलेले पूर्णेंदू तिवारी हे भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी आहेत. 2024 मध्ये कतारच्या अमिरांनी माफी दिलेल्या आठ माजी भारतीय नौदल अधिकाऱ्यांमध्ये त्यांचाही समावेश होता. मात्र, वेगवेगळ्या कायदेशीर प्रकरणांमध्ये अडकल्यामुळे ते अद्याप दोहा येथील तुरुंगात आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत समोर आलेल्या अलीकडील वृत्तांमुळे भारताची चिंता वाढली आहे.






