
Govind Dev Giri Viral Video, Ram Mandir Treasurer Snatching Mic
Govind Dev Giri Viral Video: राम मंदिराच्या देणगी वादाच्या पार्श्वभूमीवर, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे खजिनदार गोविंद देव गिरी यांचा ५६ सेकंदांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, एका वृत्तवाहिनीचा एक रिपोर्टर त्यांना दान चोरी प्रकरणी राजीनाम्यासंबंधी विचारताच ते संतापतात आणि पत्रकाराचा मायक्रोफोन हिसकावून घेतल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
पत्रकाराने राजीनाम्याबद्दल विचारल्यावर, ते लगेच उत्तर देतात, “मी राजीनामा का देईन?” खजिनदाराच्या जबाबदाऱ्यांबद्दल विचारल्यावरही त्यांनी अरेरावी केल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होऊन तासभरही होत नाही तोच राममंदिराच्या दान चोरी प्रकरणावरून श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे प्रमुख महंत नृत्य गोपाल दास यांचे शिष्य कमल नयन दास हे प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांवरून संतापल्याचा प्रकार समोर आला आहे.
कमल नयन दास म्हणाले की, कोणताही पुरावा नसताना मंदिरातील वस्तू गायब झाल्याचा खोटा प्रचार प्रसारमाध्यमांनी केला. हे प्रकरण अतिरंजित केले गेले आहे. प्राथमिक तपास अहवालात अनियमितता आढळल्यास जबाबदार कोण, असे विचारले असता त्यांनी थेट उत्तर देणे टाळले. ज्याने विश्वासघात केला त्याला शिक्षा होणारच.
एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराशी बोलताना, वारंवार प्रश्न विचारले जात असताना कमल नयन दास चिडले आणि मायक्रोफोनवर हात ठेवून तो काढण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका पत्रकाराने सांगितले की, त्याला फक्त उत्तरे हवी होती, परंतु कमल नयन दास यांनी प्रश्नाची उत्तरे देण्याचे टाळले. दास यांचे वर्तनामुळे उपस्थित असलेल्यांमध्ये गोंधळ उडाला.
ट्रस्टचे खजिनदार, गोविंद देव गिरी, या वादाच्या केंद्रस्थानी आहेत. ट्रस्टच्या मालाबाबत अनियमिततेचा प्राथमिक अहवाल समोर आल्यास त्यांना जबाबदार धरले जाणार नाही का, असा प्रश्न माध्यमांनी त्यांना विचारला. पण त्यांनीही थेट उत्तरे देणे टाळले आणि माध्यमांचा मायक्रोफोन काढून फेकून देण्याचा प्रयत्न केला. यामुळेच आता ट्रस्टच्या आतून आणि विरोधी पक्षांकडूनही त्यांच्या भूमिकेबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत.