
West Bengal : मिथुनदांना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा, सरकारमध्ये एन्ट्री
ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांच्यावर पश्चिम बंगाल (West Bengal) सरकारने मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यांची राज्य सरकारच्या माहिती आणि सांस्कृतिक व्यवहार विभागाच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा देण्यात आला आहे. राज्य सरकारच्या कार्मिक व प्रशासकीय सुधारणा विभागाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे.
अधिसूचनेनुसार, राज्यपालांच्या मान्यतेनंतर मिथुन चक्रवर्ती यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती तातडीने लागू झाली असून पुढील आदेशापर्यंत कायम राहणार आहे. माहिती आणि सांस्कृतिक व्यवहार विभागातील सल्लागार म्हणून ते सरकारला सांस्कृतिक विषयांवर मार्गदर्शन करतील.
Maharashtra Drought : दुष्काळाच्या मुद्द्यावर फडणवीस दिल्लीत; अमित शहांसोबतच्या भेटीत काय ठरलं?
मिथुन चक्रवर्ती यांचा बंगालच्या चित्रपट आणि सांस्कृतिक क्षेत्राशी दीर्घकाळापासून संबंध आहे. पाच दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत त्यांनी हिंदी आणि बंगाली चित्रपटसृष्टीत काम केले आहे. बंगाली चित्रपटसृष्टीत त्यांना ‘महागुरू’ या नावानेही ओळखले जाते.
यापूर्वी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी मिथुन चक्रवर्ती यांना सांस्कृतिक सल्लागाराची जबाबदारी देण्याची घोषणा केली होती. बंगालमधील चित्रपट आणि सांस्कृतिक क्षेत्राला चालना देण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे वृत्त आहे.
नवीन जबाबदारीमुळे आता मिथुन चक्रवर्ती यांचा राज्य सरकारच्या सांस्कृतिक धोरणांशी आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांशी थेट संबंध येणार आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर बंगालच्या कला, संस्कृती आणि चित्रपट क्षेत्रातील पुढील योजनांमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
मिथुन चक्रवर्ती मागील अनेक महिन्यांपासून भाजपच्या प्रचारात दिसत होते. यंदाही भाजपच्या पश्चिम बंगालमधील ऐतिहासिक विजयात त्यांचा मोलाचा वाटा होता. राजकारणापासून लांब असणारे मिथुन चक्रवर्ती मात्र पश्चिम बंगालमधील सत्ता परिवर्तनात भाजपसाठी खूपच फायद्याचे ठरल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.