
Shivraj More navnath ban
पुण्यात सुरू असलेल्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी आंदोलनादरम्यान धांगडधिंग्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप करत एक व्हिडीओ दाखवला. या व्हिडीओचा हवाला देत त्यांनी युवक काँग्रेसचे पदाधिकारी शिवराज मोरे यांच्यावर गंभीर आरोप केले.
‘युवा आंदोलनातील नेता रस्त्यावर उतरून मुलीसोबत असलेल्या व्यक्तीशी वाद घालत आहे. रोहित पवार, हीच तुमची नाईट लाईफ आहे का?’, असा सवाल नवनाथ बन यांनी केला. मात्र, नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे यांनी तातडीने स्पष्टीकरण देत हे आरोप फेटाळून लावले.
शिवराज मोरे यांनी सांगितलं की, संबंधित व्हिडीओ हा ते आंदोलनात उपोषणाला बसण्यापूर्वीचा आहे. ‘सीडीआर काढून बघा. बारचा काही संबंध नाही. मी इथेच होतो आणि दीड-दोन वाजता इथून निघालो,’ असा दावा त्यांनी केला. आपण कुठल्याही बारमध्ये गेलो असल्याचं सिद्ध झाल्यास आपली नार्को टेस्ट किंवा ब्लड टेस्ट करण्याचं आव्हानही मोरे यांनी दिलं.
शिवराज मोरे यांच्या म्हणण्यानुसार, एका मुलाने एका मुलीला अडवलं होतं आणि तिला त्रास दिला जात होता. त्याबाबत फोन आल्यानंतर त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवलं.
त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी फोन करून तिथे काही मुलं हुज्जत घालत असल्याचं सांगितलं. आपण घटनास्थळी गेल्यानंतर संबंधित मुलं आपल्या अंगावर आली आणि आपण भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत होतो, असा दावा मोरे यांनी केला. मुलीला तिच्या आईकडे सोडण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.
या संपूर्ण प्रकारातून भाजपकडून MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप शिवराज मोरे यांनी केला. ‘नवनाथ बन लक्षात ठेव, तू एखाद्या माणसाचं चारित्र्यहनन करतोय. मीसुद्धा तुला सुट्टी देणार नाही,’ असा इशारा मोरे यांनी दिला. नवनाथ बन यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचाही इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, आंदोलनस्थळी आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही मोरे यांनी केला. ‘माझ्याविरोधात कारवाई करण्यासाठी ८० जणांची टीम काम करत आहे,’ असा दावा त्यांनी केला.
MPSC विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता या व्हिडीओवरून भाजप आणि युवक काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. नवनाथ बन यांनी केलेल्या आरोपांवर शिवराज मोरे यांनी दिलेल्या स्पष्टीकरणामुळे या वादाला आणखी राजकीय रंग चढला आहे.