सौजन्य- Team Navrashtra
नवी दिल्ली : ”दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लावलेल्या आणबाणीच्या विरोधात 1977 मध्ये झालेल्या निवडणुकीत लोकांनी आणीबाणीवर आपला निकाल दिला, काँग्रेसने तो न डगमगता स्वीकारला. पण तीन वर्षात काँग्रेसला एवढं प्रचंड बहुमत मिळालं, जे पीएम मोदींच्या पक्षाला (भाजप) आजपर्यंत मिळवता आलेलं नाही. अशा शब्दांत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे.
संसदेचे विशेष अधिवेशन सुरू आहे. काल संसदेत मोदी सरकारच्या वतीने आणीबाणीचा निषेध करणारा ठराव मांडण्यात आला. यावेळी सभागृहात मोठा गोंधळही झाला. यानंतर संसदेतील कामकाजावर सोनिया गांधी यांनी एका वृत्तपत्रातून देशातील नीट पेपरलीक प्रकरण, लोकसभा निवडणुकीचा निकाल, मणिपूर हिंसाचार यावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
“2024 च्या निवडणुकीत पंतप्रधानांचा वैयक्तिक, राजकीय आणि नैतिक पराभव झाला आहे. स्वतःला दैवी शक्ती घोषित करणाऱ्या पंतप्रधानांसाठी हा निवडणूक निकाल म्हणजे देशातील नागरिकांनी त्यांच्या द्वेषाच्या राजकारणाला नकार देणारा आहे. जनादेशाने द्वेषाचे आणि फुटीरतेचे राजकारण नाकारले आहे. पण पंतप्रधानांच्या वागण्यात जणू काही बदल झालाच नाही!
1975 मध्ये आणीबाणीनंतर 1977 मध्ये झालेल्या निवडणुकांचा उल्लेख करून सर्वसामान्य जनतेने कसा निकाल दिला , यावरही त्यांनी भाष्य केले आहे. इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीविरोधात 1977 मध्ये झालेल्या निवडणुकीत भारतीय जनतेने दिलेला निकाल सरकारलाही मान्य करावा लागला. काँग्रेसनेही कोणतेही आढेवेढ न घेतला तो स्वीकारला. पण 1980 मध्ये आम्ही पुन्हा बहुमताने निवडून आलो, असे बहुमत नरेंद्र मोदींना कधीच मिळू शकले नाही.
पंतप्रधान नेहमीच सहकार्याबद्दल बोलतात, पण संघर्षाचा मार्ग स्वीकारतात. सरकारने आम्हाला सभापती निवडणुकीत पाठिंबा मागितला तेव्हा आम्ही परंपरेनुसार उपसभापतीपद विरोधकांकडे जावे, अशी मागणी केली. मात्र सरकारने आमची मागणी मान्य केली नाही. मागील लोकसभेच्या कार्यकाळात चर्चेविना कायदे करणाऱ्या सर्व खासदारांना निलंबित करण्यात आले, अशी टिकाही त्यांनी यावेळी केली.
पंतप्रधान परीक्षांवर चर्चा करतात, पण NEET वर मौन बाळगतात. देशातील अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसाचार आणि धमकावण्याच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाली आहे. भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या राज्यात अल्पसंख्याकांची घरे केवळ आरोप-प्रत्यारोपाच्या जोरावर बुलडोझरने पाडली जात आहेत. पंतप्रधान आपल्या पदाच्या प्रतिष्ठेचा आदर न करता निवडणुकीदरम्यान खोटे बोलले आणि जातीय द्वेष वाढेल अशी भाषणे केली. याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
मणिपूर जळत राहिले, पण पंतप्रधानांना तिथे जायला वेळ मिळला नाही. पण 400 पारचा पंतप्रधानांचा नारा जनतेने नाकारला. याबाबत त्यांनी आत्मविश्लेषण करायला पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला.