Uattar Pradesh New CM: बिहारच्या राजकारणात सत्तांतराचे वारे: नितीश कुमार यांनी दिले भावी मुख्यमंत्र्यांचे संकेत
Bihar New CM: बिहारचा मुख्यमंत्री नितीश कुमार आज ( 18 मार्च) ‘समृद्धी यात्रे’ साठी जमुईमध्ये दाखल झाले. नितीश कुमार यांची राज्य सभेवर वर्णी लागणार असल्याची चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांनी काही सुचक संकेत दिले आहेत. जुमईमध्ये झालेल्या सभेत नितीश कुमार यांनी सम्राट चौधरी यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि लोकांना पाठिंब्यासाठी हात वर करण्यास सांगितले. आता ‘सम्राट’ सर्व कामे सांभाळतील, असंही त्यांनी सांगितलं. नितीश कुमार यांच्या या विधानातून ‘सम्राट चौधरी’ बिहारचे पुढील मुख्यमंत्री होतील का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. तसेच, सम्राट चौधरी हे मुख्यमंत्रीपदासाठी नितीश यांची पहिली पसंती आहेत का, असाही प्रश्न विचारला जात आहे.
नितीश कुमार राज्यसभेवर निवडून आले आहेत. त्यांचा कार्यकाळ १० एप्रिलपासून सुरू होत आहे. ते पुढच्या महिन्यात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊ शकतात. त्यानंतर बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन होईल. यावेळी भाजपला मुख्यमंत्री मिळण्याची दाट शक्यता आहे. या संदर्भात, सम्राट चौधरी यांच्याबाबत नितीश कुमार यांचे वक्तव्य अनेक अर्थांनी महत्त्वाचे मानले जात आहे.नितीश कुमार यांनी सम्राट चौधरी यांच्याबद्दल अशा प्रकारे बोलण्याची ही पहिली वेळ नाही. काही दिवसांपूर्वीच, कटिहारमधील एका कार्यक्रमाच्या शेवटी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या पाठीवर थाप मारली होती.
बंगालच्या निम्म्या आमदारांवर फौजदारी खटले; ADR कडून रिपोर्ट जारी
समृद्धी यात्रेअंतर्गत जमुई येथे दाखल झालेल्या नितीश कुमार यांनी कुंडघाट जलाशय प्रकल्पाचे उद्घाटन केले, जागेची पाहणी केली आणि विविध स्टॉल्सना भेट दिली. आज (बुधवार) समृद्धी यात्रेच्या चौथ्या टप्प्याचा दुसरा दिवस आहे. मुख्यमंत्र्यांचा आज नवादा येथेही एक कार्यक्रम आहे. नितीश कुमार दिल्लीला (राज्यसभा) रवाना होण्यापूर्वी हे सर्व दौरे महत्त्वाचे मानले जात आहेत.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार मंगळवारी समृद्धी यात्रेनिमित्त भागलपूर दौऱ्यावर होते. ‘जन संवाद’ कार्यक्रमादरम्यान पाहुण्यांची ओळख करून देताना निवेदिकेने (अँकर) उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांचा उल्लेख चुकून “मुख्यमंत्री” असा केला. या अनपेक्षित उल्लेखामुळे सम्राट चौधरी काहीसे अस्वस्थ झाले, मात्र मंचावर उपस्थित असलेले नितीश कुमार यांनी हसून त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि परिस्थिती सांभाळून घेतली. या घटनेमुळे उपस्थितांमध्ये काही काळ हास्यकल्लोळ झाला.
या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी एका कार्यक्रमात नितीश कुमार यांनी पुन्हा सम्राट चौधरींच्या खांद्यावर हात ठेवून “आता ते सर्व काम करतील,” असे विधान केले. भागलपूरमधील अँकरची चूक आणि नितीश कुमारांचे हे ताजे विधान यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. नितीश कुमार राज्यसभेत गेल्यास सम्राट चौधरी बिहारचे पुढील मुख्यमंत्री होऊ शकतात, अशा चर्चांना आता वेग आला आहे.






