रामनगरी अयोध्या सजली, आज रामलल्लाचा होणार विशेष सूर्याभिषेक!

आज दुपारी 12 रामल्लाचा सूर्याभिषेक होणार आहे. यासाठी रुरकी आयआयटीच्या मदतीने खास प्रणाली तयार करण्यात आली आहे.

    आज देशभरात रामनवमी (Ram Navni 2024) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. ठिकठिकाणी राम मंदिरात पुजा अर्चना करण्यात येत आहे. विविध कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात येत आहे. रामनवमीसाठी रामनगरी अयोध्याही सजली आहे. रामलल्लाची आज विषेश पूजा करण्यात येणार आहे. आजची रामनवमी अनेक अर्थांनी खास असणार आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेकनंतरचे हे पहिले नवरात्र आहे. राम मंदिर तीर्थ क्षेत्र ट्रस्टने रामनवमीची विशेष तयारी केली आहे. रामनवमीला रामजन्मोत्सवानिमित्त रामललाचा सूर्याभिषेक करण्यात येणार आहे. रामल्लाचा सूर्याभिषेक आज दुपारी ठीक 12 वाजता होणार आहे. त्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे.

    दुपारी बारा वाजता होणार सुर्यअभिषेक

    आज दुपारी 12 रामल्लाचा सूर्याभिषेक होणार आहे. यासाठी रुरकी आयआयटीच्या मदतीने खास प्रणाली तयार करण्यात आली आहे. यासाठी रुरकी आयआयटीच्या शास्त्रज्ञांच्या चमूने गर्भगृहात अनेक आरसे आणि लेन्स लावले आहेत. या प्रणालीद्वारे दुपारी ठीक 12 वाजता मंदिराच्या सर्वात वरच्या मजल्यावर (तिसऱ्या मजल्यावर) लावलेल्या आरशावर सूर्यकिरण पडतील. हे किरण आरशातून ९० अंशांवर परावर्तित होतील आणि पितळी पाईपमध्ये प्रवेश करतील. पाईपच्या शेवटी आणखी एक मिरर निश्चित केला आहे. या आरशातून सूर्यकिरण पुन्हा परावर्तित होऊन पितळी पाईपच्या साहाय्याने गर्भगृहातील आरसे आणि लेन्सद्वारे रामलल्लाच्या डोक्यावर पडतील. त्यानंतर  सुर्य किरणांनी रामललाचा चेहरा चार मिनिटे सतत उजळला जाईल.

    सूर्याभिषेक लाइव्ह पाहता येणार

    भक्तांना सूर्याभिषेकचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन आणि त्यांच्या मोबाईलवरच पाहता येणार आहे. हा टिळक ७५ मिमीच्या वर्तुळाकार स्वरूपात असेल.राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय म्हणाले की, श्री रामलाला यांचे सूर्य टिळक करण्याची तयारी पूर्ण जोमाने केली जात आहे. शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांना रामनवमीला फळ मिळण्याची शक्यता आहे. अंदाजे 100 एलईडी स्क्रीनद्वारे याचे थेट प्रक्षेपण केले जाईल.