काँग्रेसची राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका (फोटो- विकिपीडिया/सोशल मीडिया)
नवी दिल्ली: काल आपल्या भारत देशाचा ७९ वा स्वातंत्र्यदिन पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. मोदी यांनी १०३ मिनिटे संबोधन करून आपले आधीचे रेकॉर्ड मोडून काढले आहेत. दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात अनेक विषयांवर भाष्य केले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबदल भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देखील कौतुक केले आहे. मात्र आता यावरून काँग्रेसने भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेस नेत्याने संघाला तालिबानची उपमा दिली आहे.
काँग्रेस नेते आणि माजी खासदार बीके हरिप्रसाद यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केली आहे. बीके हरिप्रसाद एका वृत्तसंस्थेला दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाले, “मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी करेन. संघ देशाची शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहे. संघ हा भारतीय तालिबान आहे आणि मोदी लाल किल्ल्यावरून त्याचे कौतुक करत आहेत.” बीके हरिप्रसाद यांनी संघाला मिळणाऱ्या निधीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
पुढे बोलताना बीके हरिप्रसाद म्हणाले, “संघाचा कोणता स्वयंसेवक होता की ज्याने स्वातंत्र्य संग्रामात सहभाग घेतला होता?” लाल किल्ल्यावरून संघाचा उल्लेख करणे हे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही रजिस्टर संघटना नाही. संघाला निधी कसा मिळतो हे आम्हाला माहिती नाही? कोणत्याही संघटनेला देशभरात काम करण्यासाठी नोंदणी करावी लागते, असे बीके हरिप्रसाद म्हणाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ‘RSS’ वर स्तुतीसुमने
दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी आरएसएसचे कौतुक केले. जगातील सर्वात मोठी गैर-सरकारी संस्था असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “आज मी अभिमानाने सांगू इच्छितो, १०० वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाच्या एका संघटनेचा जन्म झाला. १०० वर्षे राष्ट्रसेवा हा एक सुवर्ण अध्याय आहे. राष्ट्रीय स्वयंमेवक संघाला १०० वर्षांचा इतिहास आहे. जगातील सगळ्यात मोठी गैर सरकारी संघटना म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.” पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “व्यक्ती निर्माणापासून ते राष्ट्र उभारणीच्या दृढ संकल्पाने, भारतमातेच्या कल्याण्यासाठी संघ स्वयंसेवकांनी आपले जीवन समर्पित केले.