दिल्ली : लोकसभा निवडणूकीचा महानिकाल आता समोर येत आहे. आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरु होती. यामध्ये अनेक आश्चर्यकारक निर्णय आले आहे. एनडीए आघाडीला पूर्णपणे बहुमत मिळाले नसून 400 पारचा आकडा देखील भाजप गाठू शकलेला नाही. त्याचबरोबर इंडिया आघाडीला समाधानकारक अशा लोकसभेच्या जागा मिळाल्यामुळे इंडिया आघाडीकडून जल्लोष व्यक्त केला जात आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि भाजप नेते अमित शाह हे लाखांच्या मतांनी आघाडीवर आहेत.
राहुल गांधी रायबरेलीतून विजयी
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी वायनाड व रायबरेली या दोन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. मोतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून राहुल गांधी हे आघाडीवर होते. सकाळी वायनाडमधून राहुल गांधी तब्बल 65 हजार मतांनी आघाडीवर होते. त्यानंतर आता राहुल गांधींची आघाडी हजारांहून लाखोंच्या घरात गेली आहे. त्यामुळे कॉंग्रेस पक्षामध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. राहुल गांधी हे रायबरेली मतदारसंघातून तब्बल ४ लाख मतांनी विजयी झाले आहेत. राहुल गांधी यांच्या विरोधातील भारतीय जनता पक्षाचे दिनेश प्रताप सिंह यांचा पराभव दारुण पराभव झाला आहे. इंडिया आघाडीकडून सरकार स्थापनेचे पूर्ण प्रयत्न केले जाणार असून इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाले तर राहुल गांधी हे पंतप्रधान पदाचा चेहरा ठरु शकतात.
अमित शाह यांची तब्बल 5 लाखांची लीड
राहुल गांधी यांच्याबरोबरच भाजप नेते अमित शाह यांनी देखील लाखांच्या घरामध्ये आघाडी मिळवली आहे. भाजप नेते अमित शाह यांनी गुजरातची राजधानी गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. सकाळपासून अमित शाह हे आघाडीवर होते. त्यानंतर आता अमित शाह यांनी लाखोंची आघाडी घेतली आहे. त्यांची ही आघाडी विक्रमी आघाडी ठरणार आहे. अमित शाह यांच्याविरोधात गांधीनगर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार सोनल पटेल उभे होते. मात्र अमित शाह यांनी तब्बल 5 लाखांची लीड घेतली आहे.