जगदलपूर : छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी भाजप नेत्या कोमल मांझी (Komal Manjhi) यांची गळा चिरून हत्या केली. कोमल मांझी या शनिवारी सकाळी मंदिरातून परतत असताना आलेल्या नक्षलवाद्यांनी त्यांना पकडून त्यांचा गळा चिरला. आमदई खाणीचे दलाल असल्याचा आरोप नक्षलवाद्यांनी केला आहे. ही घटना छोटाडोंगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, कोमल मांझी शनिवारी सकाळी छोटेडोंगर गावात असलेल्या शितला माता मंदिरातून परतत होत्या. दरम्यान, 4 ते 5 नक्षलवादी तेथे आले आणि त्यांनी धमकी दिली. निर्जन भाग पाहून नक्षलवाद्यांनी मांझींना पकडून जंगलाच्या दिशेने नेले. यानंतर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. त्यानंतर नक्षलवाद्यांनी मृतदेह गावाजवळ फेकून दिला.
मृतदेहाजवळ पॅम्प्लेटही फेकले
शनिवारी सकाळी 10 ते 11 च्या दरम्यान नक्षलवाद्यांनी ही घटना घडवली. घटनेनंतर नक्षलवादी जंगलात पळून गेले. गावकऱ्यांनी मृतदेह पाहिल्यानंतर पोलिसांना माहिती दिली. नक्षलवाद्यांनी मृतदेहाजवळ पत्रकेही फेकली होती. कोमल मांझी आमदाई खाणीत दलाली करत होत्या, असे या पत्रकात लिहिले आहे. याआधीही त्यांना इशारा देण्यात आला होता, मात्र त्यांनी ऐकले नाही.