केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थोडक्यात बचावले; प्रचार रथाचा वरचा भाग विजेच्या तारेच्या संपर्कात आला अन्…

राजस्थानात विधानसभा निवडणुकीची (Rajasthan Politics) रणधुमाळी सुरू आहे. सत्ताधारी काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशी थेट राजस्थानात आहे. स्टार प्रचारकांच्या सभा, रॅलींना सुरुवात झाली आहे.

    जयपूर : राजस्थानात विधानसभा निवडणुकीची (Rajasthan Politics) रणधुमाळी सुरू आहे. सत्ताधारी काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशी थेट राजस्थानात आहे. स्टार प्रचारकांच्या सभा, रॅलींना सुरुवात झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मंगळवारी प्रचारासाठी राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात पोहोचले.

    भाजपच्या प्रचार रथाचा वरील भाग विजेच्या तारेच्या संपर्कात आला. सुदैवाने अमित शहा थोडक्यात बचावले. केंद्रीयमंत्री अमित शहांचा ताफा बिदियाद गावातून परबतसरच्या दिशेने जात होता. एका गल्लीतून ताफा जात होता. गल्लीच्या दुतर्फा दुकाने आणि घरे होती. त्यावेळी रथाचा वरचा भाग तारेच्या संपर्कात आला. त्यामुळे स्पार्किंग झाले.

    याचदरम्यान, विजेची तार रस्त्यावर पडली. त्यानंतर रथामागील अन्य वाहने लगेचच थांबली. वीज पुरवठा तातडीने खंडित करण्यात आला. यामध्ये कोणतीही हानी झाली नसली तरी या प्रकाराने सुरक्षा यंत्रणांची चांगलीच पळापळ झाली.