सौजन्य - नवराष्ट्र टीम
दरम्यान, शहरात मालवाहू ट्रक व इतर अवजड वाहनांकडून रस्त्यांवरच माल चढ-उतार केला जात आहे. यामुळे मुख्य रस्त्यांवर वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होते. अनेक वाहनचालक कुठेही, कधीही आपली वाहने उभी करून निघून जातात, ज्यामुळे परिस्थिती अधिकच बिघडते. या बेजबाबदार वर्तनामुळे वाहतुकीचे पूर्णपणे तीन तेरा वाजल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे.
प्रशासनाकडून या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. तसेच, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सर्वपक्षीय नेतेही या गंभीर प्रश्नावर मौन बाळगून असल्याचे दिसत आहे. राजकारणात व्यस्त असलेल्या नेत्यांकडून शहराच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी नागरिक व्यक्त करत आहेत.
वाई नगरपालिकेतील नगरसेवकांनीही या प्रश्नावर ठोस भूमिका घेतलेली दिसत नाही. वाहतुकीच्या समस्येबाबत एकाही नगरसेवकाने प्रभावीपणे आवाज उठवलेला नसल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत. सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन राज्य शासनाकडे पाठपुरावा करून वाई शहरासाठी अधिक वाहतूक पोलीस, योग्य पार्किंग व्यवस्था आणि शिस्तबद्ध वाहतूक नियोजन यासाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा, येत्या काळात ही समस्या आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वाईकर नागरिकांचा एकच सवाल आहे की या समस्येचा कायमस्वरूपी तोडगा नेमका कधी निघणार?






