ट्रम्प–ममदानी भेटीवरील थरूर यांची सोशल मीडिया पोस्ट; काँग्रेसच्या गोटात खळबळ
अशातच आज (22 नोव्हेंबर) त्यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावरून लक्ष वेधले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि न्यूयॉर्क शहराचे नवनिर्वाचित महापौर जोहरान ममदानी यांच्यात झालेल्या भेटीवर थरूर यांनी आपल्या ट्विटर एक्सवर पोस्ट शेअर केली आहे.. त्यांच्या या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून, थरूर यांच्या भाष्याचा संदर्भ काय, याबाबतही वेगवेगळ्या व्याख्या काढल्या जात आहेत.
नितीश कुमार फक्त चेहरा मात्र ‘स्टीअरिंग व्हील’ भाजपकडेच; अमित शहांनी खेळली ‘ही’ स्मार्ट खेळी
न्यूयॉर्क महापौरपदाच्या निवडणुकीदरम्यान डोनाल्ड ट्रम्प आणि जोहरान ममदानी यांच्यात मोठा संघर्ष पाहायला मिळाला. जोहरान ममदानी महापौर झाल्यास आपण न्युयॉर्कचा निधी रोखू, असा खुला इशाराही त्यांनी दिला होता. अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स आणि रिपब्लिकन नेत्यांनीही ममदानींवर टीकेची एकही संधी सोडली नव्हती. मात्र, निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांत डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये ममदानी यांची भेट घेतली. या भेटीमुळे अमेरिकेतच नव्हे तर भारतीय राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत. दोन्ही नेत्यांच्या मैत्रीपूर्ण संवादाचे मोठ्या प्रमाणात कौतुकही होत आहे.
त्याचवेळी काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी या भेटीचा व्हिडिओ आपल्या X खात्यावर शेअर करत प्रतिक्रिया दिली. “निवडणूक प्रचारादरम्यान राजकीय पक्ष विरोधी असतात, पण राष्ट्रीय हितासाठी त्यांनी असे एकत्र येणे आवश्यक आहे,” असे थरूर यांनी नमूद केले. तसेच, “लोकशाहीच असंच काम व्हायला हवे. मला भारतातही असे चित्र पाहायला आवडेल.” असं थरूर यांनी म्हटलं आहे. पण थरूर यांच्या या भाष्याची सोशल मीडियावर मोठी चर्चा होत असून भारतीय राजकीय संस्कृतीवर त्यांनी केलेला सूचक टोला अनेकांनी लक्षात घेतला आहे.
थरूर म्हणाले, “निवडणुकांमध्ये आपल्या दृष्टिकोनासाठी कोणत्याही वक्तृत्वाच्या बंधनाशिवाय उत्साहाने लढा. पण एकदा निवडणुका संपल्या आणि लोकांनी निर्णय दिला की, ज्या देशाची सेवा करण्याचे तुम्ही दोघांनी वचन दिले आहे त्या देशाच्या समान हितासाठी एकमेकांना सहकार्य करायला शिका.”
तसेच, भारतामध्येही मतभेद संपल्यानंतर सहकाराचे हेच समीकरण साध्य करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियावरील त्यांच्या या भूमिकेचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत असून, भारतीय राजकारणात सकारात्मक राजकीय संस्कृतीची गरज अधोरेखित करणारा संदेश असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
डोनाल्ड ट्रम्प आणि जोहरान ममदानी यांच्या भेटीवर शशी थरूर यांनी केलेल्या भाष्याचा उद्देश व्यापक लोकशाही सभ्यतेला आवाहन करणे असा स्पष्ट केला असला, तरी त्यांची ही भूमिका काँग्रेसमध्ये नव्या चर्चांना तोंडफोड देणारी ठरली आहे. सध्या काँग्रेस पक्ष भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अधिक आक्रमक धोरण अवलंबत असताना थरूर यांनी दिलेला हा ‘समन्वयाचा संदेश’ वेगळाच ठरला आहे.
काही दिवसांपूर्वीच रामनाथ गोयंका व्याख्यानात शशी थरूर यांनी पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाचे वर्णन “आर्थिक दृष्टिकोन आणि सांस्कृतिक कृतीचे आवाहन” असे केले होते. त्यांच्या या टिप्पणीवरही तीव्र टीका झाली होती. थरूर यांच्या सलग अशा प्रतिक्रियांमुळे काँग्रेसमधील काही वरिष्ठ नेते अस्वस्थ झाले आहेत. संदीप दीक्षित आणि सुप्रिया श्रीनेत यांसारख्या नेत्यांनी थरूर यांच्या अशा विधानांवर सार्वजनिकरित्या प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारविरोधात काँग्रेस किती तीव्र भूमिका घेत आहे, हे पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवले. या पार्श्वभूमीवर, थरूर यांची ट्रम्प–ममदानी भेटीवरील ताजी पोस्ट पक्षातील सर्व घटकांना तितकी सहजपणे रुचेलच असे नाही, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.






