नवी दिल्ली : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Prices) कपात करण्याची चर्चा माध्यमांत सुरू आहे. या संदर्भात ओएमसी आणि सरकारमध्ये बोलणी सुरू असल्याची शक्यता पेट्रोलियममंत्री हरदीपसिंग पुरी यांनी फेटाळून लावली आहे.
पुरी म्हणाले, सरकारी तेल कंपन्या इंधनाच्या किंमती कमी करण्याबाबत केंद्र सरकारशी कोणतीही चर्चा करत नाहीत. सर्व मीडिया रिपोर्ट्स केवळ अनुमानांवर आधारित आहेत. अशा कोणत्याही मुद्द्यांवर सरकारची तेल कंपन्यांशी कोणतीही चर्चा झाली नाही. सध्या प्रचंड अशांततेचे वातावरण आहे. जगातील दोन प्रमुख भागांमध्ये संघर्ष सुरू आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती अस्थिर आहेत. 2024 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी सोशल मीडियावर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या.
पुरी म्हणाले की, इंधनाच्या दरात कपातीचे हे वृत्त दिशाभूल करणारे आहे. याआधी डिसेंबरमध्ये काही माध्यमांनी अर्थ मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा हवाला देत पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करण्याच्या शक्यतेबाबत सांगितले होते. त्या वेळी, अधिकाऱ्याने सांगितले की, ब्रेंट क्रूडच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारात आधीच घसरल्या आहेत. त्यामुळं इंधन उत्पादन शुल्कात कपात करण्याचे कोणतीही शक्यता नाही.
कर कपातीचा प्रश्नच उद्भवत नाही
जेव्हा कच्च्या तेलाच्या किमती जास्त होत्या तेव्हा आम्ही उत्पादन शुल्क कमी केले. जेव्हा किंमती आधीच खाली आल्या आहेत, तेव्हा कर कपातीचा प्रश्नच उद्भवत नाही, असे म्हणत त्यांनी सर्व शक्यतांना पूर्णविराम दिला.