
चक्क सोसायटीतच झालं Traffic Jam,रहिवाशी महिलेनं केलं व्हिडीओ Viral
बंगळुरूतील वाहतूक कोंडी ( Traffic Jam) सर्वांनाच ज्ञात आहे, पण आता येथील सोसायट्यांच्या आवारातही वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा लागत असल्याचे चित्र समोर आले आहे. त्या महिलेने याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून सध्या तो चर्चेचा विषय ठरला आहे.
ही घटना सकाळ किंवा संध्याकाळची नसून शनिवार दुपारची आहे. चक्क दुपारी 2 वाजता त्या महिलेच्या सोसायटीच्या आवारात वाहतूक कोंडी झाली. तिने लगेचच आपल्या मोबाईलमधून त्याचे चित्रिकरण करत तो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.
त्या महिलेच्या म्हणण्यानुसार, सोसायटीच्या आवारातून मुख्य रस्त्यापर्यंत पोहचण्यासाठी रहिवाशांना चक्क वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. सोसायटीच्या बाहेर पडण्याच्या मार्गावर वाहनांची मोठी रांग लागली होती. त्यामुळे काही रहिवाशांना सोसायटीबाहेर पडण्यासाठी तब्बल 30 मिनिटांपर्यंत प्रतीक्षा करावी लागत होती.
त्या महिलेने शेअर केलेल्या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. बंगळुरूतील रस्त्यारस्त्यांवरील वाहतूक कोंडी आता निवासी सोसायट्यांच्या आवारातही पोहोचल्याचे पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी मोठ्या निवासी प्रकल्पांमध्ये अंतर्गत रस्ते आणि प्रवेश निर्गमन मार्गांचे योग्य नियोजन नसल्याने भविष्यात समस्या आणखी वाढू शकतात, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
अनेकांनी हा व्हिडिओ वर्थूर येथील ब्रिगेड यूटोपिया येथील असल्याचे म्हटले आहे. या भागातील अरुंद रस्ते आणि वाढती वाहनांची संख्या यामुळे येथे मोठी वाहतूक कोंडी होत असल्याचेही काही जणांनी नमूद केले.
दरम्यान देशातील मोठ्या शहरांत टोलेजंग इमारती साकारण्यात येत असल्या तरी त्यातील वाहतूक नियोजनाचा अभाव स्पष्टपणे जाणवत असल्याचेही त्या महिलेच्या व्हिडीओमधून दिसत आहे.