(फोटो- ट्विटर )
हरियाणा विधानसभा निवडणुकीवरून राजकारण तापले आहे. एकीकडे तिकीट न मिळाल्यामुळे भाजपमध्ये नाराज नेते बंडखोरीच्या मार्गावर आहेत. त्यामुळे भाजप डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न करत आहे. अशातच एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान स्टार कस्तीपटू बजरंग पुनियाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. काँग्रेस पक्षात पुनियाने दोन दिवसांपूर्वीच प्रवेश केला आहे.
स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाने काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. काँग्रेस पक्षाने बजरंग पुनियाला किसान काँग्रेसचे कार्याध्यक्ष पद देण्यात आले आहे. मात्र आता त्याला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बजरंग पुनियाला परदेशातील नंबरवरून व्हॉट्सॲपवर एक मेसेज आला आहे. त्यातून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या मेसेजमध्ये, ”बजरंग काँग्रेस सोड. नाहीतर तुझे आणि तुझ्या कुटुंबाचे चांगले होणार नाही. त्यामुळे हा आमचा शेवटचा इशारा आहे”, अशा प्रकारची धमकी देण्यात आली आहे.
जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर बजरंग पुनिया यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पोलिसांनी हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने हाताळत आहेत. मेसेज करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. तसेच बजरंग पुनियाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
बजरंग पुनियाचा काँग्रेसमध्ये प्रवेश
बजरंग पुनिया यांनी पक्षात प्रवेश करताच काँग्रेसचे आभार मानले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू बजरंग पुनिया काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांनी भाजपवर टीका केली. आम्ही भाजपकडे मदत मागितली होती, तरीही ते आम्हाला साथ देऊ शकले नाहीत, मात्र काँग्रेसने आम्हाला नेहमीच साथ दिली. विनेशच्या पराभवावर संपूर्ण देश रडत होता पण एक आयटी सेल जल्लोष करत होता, अशा शब्दांत बजरंग पुनियाने भाजपच्या आयटी सेलवर निशाणा साधला.
हेही वाचा: खेळाचे मैदान सोडल्यानंतर विनेश फोगाट, बजरंग पुनियाचा काँग्रेसमध्ये प्रवेश; राजकारणात नशीब आजमावणार
काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या दोन दिवस आधी विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते कधीही काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. त्यानंतर आता हे दोघे काँग्रेसकडून कोणत्या जागेवर निवडणूक लढवणार याची चर्चा रंगली आहे. काँग्रेस अध्यक्षांना भेटण्यापूर्वी दोघांनीही रेल्वेची नोकरी सोडली. ही माहिती देत त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिले, “भारतीय रेल्वेची सेवा हा माझ्या आयुष्यातील संस्मरणीय आणि अभिमानास्पद काळ आहे. माझ्या आयुष्याच्या या वळणावर, मी रेल्वे सेवेपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे आणि भारतीय रेल्वेच्या सक्षम अधिकाऱ्यांकडे माझे राजीनामा पत्र सादर केले आहे. देशसेवेसाठी रेल्वेने मला दिलेल्या या संधीबद्दल मी भारतीय रेल्वे परिवाराचा सदैव ऋणी राहीन.”