20 हजार कोटींची गुंतवणूक, 12 हजार नोकऱ्या निर्माण होणार; अदानी समुह 'या' ठिकाणी उभारणार औष्णिक ऊर्जा प्रकल्प
गेल्या काही काळात अदानी समुहाने देशातील उद्योगधंद्यांमध्ये आपली चांगलीच पकड निर्माण केली आहे. विशेष म्हणजे अदानी समुह हा भारतातच नाही तर आजुबाजूच्या देशांना देखील उर्जा पुरवत आहे. अशातच आता अदानी समूह आणखी एक औष्णिक ऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या तयारीत आहे. शुक्रवारी (ता.२०) बिहार बिझनेस कनेक्ट 2024 समिटमध्ये अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडचे संचालक प्रणव अदानी यांनी याबाबत घोषणा केली आहे. या प्रकल्पासाठी 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी आपल्या ऊर्जा क्षेत्राचा सातत्याने विस्तार करत आहेत. त्यांची कंपनी आणखी एक औष्णिक वीज प्रकल्प उभारणार आहे. हा पॉवर प्लांट बिहारमध्ये उभारला जाणार आहे. यासाठी 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. यामुळे 12,000 हून अधिक लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. याशिवाय बिहारमध्ये सिमेंट, फूड प्रोसेसिंग आणि लॉजिस्टिकमध्येही हा समूह विस्तारणार आहे.
या प्रकल्पांची घोषणा अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडचे संचालक प्रणव अदानी यांनी शुक्रवारी बिहार बिझनेस कनेक्ट 2024 समिटमध्ये केली आहे. ते म्हणाले आहे की, अदानी समूह लॉजिस्टिक, गॅस वितरण आणि कृषी लॉजिस्टिक या तीन प्रमुख क्षेत्रांमध्ये आधीच गुंतलेला आहे. ज्यामध्ये आतापर्यंत 850 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.
अनिल अंबानींचा मोठा डाव; रिलायन्स पॉवरला मिळाला भारतातील सर्वात मोठा सौर आणि बॅटरी स्टोरेज प्रकल्प
काय आहे कंपनीची योजना
अदानी समूहाने बिहारमधील ऊर्जा क्षेत्रात 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले आहे. या अंतर्गत हा समूह बिहारमध्ये सुपर क्रिटिकल थर्मल पॉवर प्लांट बांधण्यात येणार आहे. प्रणव अदानी म्हणाले की, ‘आम्हांला आशा आहे की, हा मोठा प्रकल्प प्री-कमिशनिंग टप्प्यात किमान 12 हजार नोकऱ्या निर्माण करण्यास मदत करेल. तसेच, त्याचे परिचालन टप्प्यात कुशल कामगारांना नोकऱ्या निर्माण होण्यास मदत होईल.
अदानी समूह या प्रकल्पासासह बिहारमध्ये इतर अनेक क्षेत्रात गुंतवणूक करणार आहे. प्रणव अदानी म्हणाले आहे की, ‘आम्ही लॉजिस्टिक, गॅस वितरण आणि कृषी लॉजिस्टिकमध्ये आणखी 2300 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहोत. या गुंतवणुकीमुळे आमच्या गोदाम आणि हाताळणी क्षमतेतच नाही तर EV, सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन (CGD) आणि कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) क्षेत्रातही वाढ होणार आहे.”
याशिवाय, अदानी समूह सिवान, गोपालगंज, वैशाली, सारण आणि समस्तीपूर यांसारख्या शहरांमध्ये 28 लाखांहून अधिक स्मार्ट मीटर तयार करण्यासाठी आणि स्थापित करण्यासाठी 2100 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यामुळे या क्षेत्रात किमान 4000 स्थानिक रोजगार निर्माण होणार आहे. याशिवाय हा ग्रुप सिमेंट प्लांटचाही विस्तार करणार आहे.
अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये वाढ
समूहाच्या या घोषणेनंतर अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. शुक्रवारी दुपारी 2 च्या सुमारास अदानी पॉवर लिमिटेडचे शेअर्स 0.67 टक्क्यांनी वाढून 511.70 रुपयांवर व्यवहार करत होते. मात्र, अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. दुपारी 2 च्या सुमारास या कंपनीचे शेअर्स 2,392.10 रुपयांवर व्यवहार करत, एक टक्क्यांहून अधिक घसरले आहे.