नागपूर : शिवसेना आमदार अपात्र निर्णयानंतर (MLA Disqualification Case) विरोधकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी शिंदे गटाच्या (Shinde Group) बाजूने निकाल दिल्यामुळे ठाकरे गटाने (Thackeray group) आक्रमक भूमिका घेतली आहे. नार्वेकर यांनी पक्षपातीपणा केला असून नार्वेकर हे शिंदे गटाचे वकिल असल्याप्रमाणे निकाल वाचत असल्याची टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली होती. यानंतर आता ठाकरे गटाने न्यायालयामध्ये धाव घेणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र यावर भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी सडकून टीका केली. त्यांनी उच्च न्यायालयात जावे मात्र तिथेही त्यांच्या पदरी निराशाच येईल अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता सुनावणीवर निकाल दिल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधाऱ्यांनी हा निकाल योग्य असल्याचे म्हटले तर विरोधकांनी पक्षपाती निर्णय असल्याची टीका केली. यानंतर नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधत असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली. उद्धव ठाकरे यांना आमदार, खासदार सोडून गेले तेव्हाच त्यांचे पक्षातील नेतेपद संपले होते. अध्यक्षांनी दिलेला निर्णय योग्य असून उच्च न्यायालयात जाण्यापासून त्यांना कोणीही रोखले नाही, त्यांनी उच्च न्यायालयात जावे मात्र तिथेही त्यांच्या पदरी निराशाच येईल अशी भविष्यवाणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
“निकाल हा निकाल असतो. मेरीटच्या आधारावर तो निकाल दिलेला आहे. जे मेरिट निवडणूक आयोगाने दिले आहे त्याच आधारावर निकाल लागला आहे. या निकालाचा पुढील राजकारणाशी काहीही संबंध नाही. विविध पक्षातील नेते यापूर्वीच एकनाथ शिंदे गटाकडे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये येण्यास उत्सुक आहे. जे लोक आमच्याकडे येतील त्यांच्यासाठी आमचे दुपट्टे तयार आहे” असे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले.
पुढे ते ठाकरे गटावर टीका करताना म्हणाले, “विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी निकाल पारदर्शक पद्धतीने दिला आहे. मतदानाच्या आधारावर पक्षाची नोंद होत असते. निवडून आलेले लोकप्रतिनिधी जर तुमच्या सोबत नसेल तर आपोआपच पक्षाचे नेतेपद जाते. सर्वात जास्त लोकप्रतिनिधी आणि मते शिंदे गटाकडे आहे त्यामुळे तेच नेते असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले. नियम सर्वांना सारखेच आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वेगळा नियम उद्धव ठाकरे यांना वेगळा नियम, असे होणार नाही.” अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.