गडचिरोली – विदर्भात गडचिरोली ( Gadchiroli )जिल्ह्यात पोलिसांनी २६ नक्षलवाद्यांना यमसदनी ( 26 Naxalites killed)पाठवल्याचा दावा केला आहे. ग्यारापट्टीच्या जंगलात पोलिसांच्या सी-६० तुकडीसोबत नक्षलवाद्यांची चकमक झाली. यात २६ नक्षलवादी मारले गेले आहेत. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल (Maharashtra police) यांनी ही माहिती दिली आहे. या चकमकीत तीन पोलीस जवानही जखमी झाले आहेत.
काही दिवसांपूर्वी याच परिसरात पोलिसांनी दोन लाखांचे इनाम असलेल्या नक्षली मंगारु मांडवी याला अटक केली होती. नक्षलवादी मंगारु याच्यावर हत्या आणि पोलिसांवर हल्ला करण्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
आमच्या पोलिसांचा मला अभिमान, गृहमंत्र्यांनी केले गडचिरोली पोलिसांचे कौतुक
गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापत्तीच्या जंगलात माओवाद्यांच्या विरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रशंसा केली आहे. “आमच्या पोलिसांचा मला अभिमान आहे,” अशा शब्दांत गृहमंत्र्यांनी पोलिसांचे कौतुक केले.आजची कारवाई ही राज्याच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासातील उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे. राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची आहे. या कारवाईत २६ नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले. तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. नक्षलवाद्यांविरोधात करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिस दलाचे तीन जवान जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
मध्यप्रदेशातील बालाघाटमध्ये दोन स्थानिकांची नक्षलवाद्यांनी केली हत्या
मध्य प्रदेशातील बालाघाटमध्ये दोन स्थानिक नागरिकांची नक्षलवाद्यांनी हत्या केली आहे. पोलिसांना माहिती देत असल्याच्या कारणावरुन मालखेडी गावात हे हत्याकांड करण्यात आले. लांजीच्या जंगलात पोलिसांनी ७ नोव्हेंबरला मोठी स्फोटके जप्त केली होती. गावातील कुणीतरी ही माहिती पोलिसांना दिली, असा नक्षलवाद्यांना संशय होता. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मृतांच्या परिवारांना पाच लाखांच्या मदतीची घोषणा केली आहे. तसेच घरातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याचे आश्वासनही दिले आहे.